लातूर : लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने जवळपास सहा दशके राजकारणात सेवा देणारे राजयोगी, सुसंस्कृत, अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले. जात-धर्म-भाषा-पक्ष यासारख्या भिंतींच्या पलीकडे जावून त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या, देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
लातूर येथे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर व कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार बसवराज पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यावेळी उपस्थित होते.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या राजकीय जीवनात लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल, लोकसभेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली. अतिशय स्वच्छ चारित्र्य असलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकाळात लोकसभा अध्यक्ष पदाचा नवा मापदंड निर्माण केला. राजकीय संस्कृती कशी असावी, सुसंस्कृत नेता कसा असावा, याची प्रेरणा शिवराज पाटील चाकूरकर यांच्यापासून मिळते, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आपण घेतलेल्या अनेक निर्णयांचे शिवराज पाटील चाकूरकर यांनी स्वतः फोन करून कौतुक केल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीवेळी झालेल्या चर्चेची आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.