सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 13 मंडलात नुकसान झाले आहे. म्हसवड येथील काही घरांमध्ये पाणी गेले होते. 22 दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. रस्ते बंद होते. आता रस्ते खुले झाले असून 1 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले असून पंचनामे ग्रासरुट जावून ग्रामविकास अधिकारी, कृषी विकास अधिकारी, महसूल सहाय्यक हे करत आहेत. ज्यांचे 30 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशांना मदत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, सातारा जिह्यात 13 मंडलात पाऊसाने नुकसान झाले आहे. म्हसवड शहरांमध्ये काही घरांमध्ये पाणी गेलेलं होतं जवळपास 20 ते 22 दुकानांमध्ये पाण्यामुळे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झालेले होते. आता सर्व रस्ते पूर्ववत खुले झालेले आहेत. दुसऱ्या दिवसापासून कुठेही अतिवृष्टी झाली नव्हती. तीन मंडलात 28 तारखेला अतिवृष्टी झाली होती. ती महाबळेश्वर तालुक्यात त्या दिवशी झाली नव्हती. पूर्व भागामध्ये पाणी सगळं कमी झालेले असून रस्ते पूर्ववत सुरु झालेले आहेत. पंचनामे करण्याचे काम अतिवृष्टी झालेल्या 13 मंडळामध्ये काम सुरू आहे. जवळपास 1 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी कृषी सहाय्यक, महसूल सहाय्यक आणि ग्रामपंचायत अधिकारी पाठवले आहे. जेथे 30 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान दर्शवत असतील तर त्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे शासनाचे निर्देशांक आहेत. तसेच सततच्या पावसामुळे जे नुकसान होत असते त्यासाठी वेगळा आदेश शासन दरवर्षी काढत असते. त्याच्याविषयी मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊन तो निर्णय घेतला जातो. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय होऊन आम्हाला निर्देश प्राप्त होतील. त्यानुसार पीक कापणीनुसार उत्पादन क्षमतेनुसार भरपाई दिली जाते. यावर्षी पावसाचा खंड पडलेला नाही. त्यामुळे पीके सुकायला लागली आहेत. अतिवृष्टी प्रत्येक महिन्यात झाली आहे. ऑगस्टमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्याच्या अगोदर म्हणजे 17, 18, 19 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये पाऊस जास्त झाला होता. त्यावेळेस पूर्वेकडे पाऊस झाला नव्हता आणि पश्चिम घाटामध्ये सुद्धा आपल्या नद्याची कॅरिंग कॅपॅसिटी जेवढी होती त्याच्यापेक्षा खूप जास्त पाणी झाल्याने नदी पात्रात पाणी सोडले होते. काही ठिकाणी रस्ते बंद झालेले होते. नंतर सुदैवाने पाऊस कमी झाल्यामुळे असेल फार मोठ्या आपत्तीला आपल्याला काही सामोरे जावे लागले नाही, असे त्यांनी सांगितले.
मदत करण्याचे आवाहन
ज्या दानशुर व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींनी, संस्थांनी पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. दरम्यान, दुष्काळी तालुक्यात वाहून गेलेला तो व्यक्ती सापडलेला असून त्याच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.