संगम माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ

छत्रपती शाहू महाराज थोरले यांची समाधी गेली पाण्याखाली कैलास स्मशानभूमीच्या पायऱ्यांना पाणी टेकले

by Team Satara Today | published on : 23 May 2025


सातारा : सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाने प्रचंड मोठा फटका दिला आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. या पाण्यामुळे नदीपात्रात असलेली छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी निम्मी पाण्याखाली गेली आहे, तर काशी विश्वेश्वर मंदिरासह येथील कैलास स्मशानभूमीच्या पायऱ्यांना पाणी टेकले आहे.

सातारा जिल्ह्यात दरवर्षी 15 जून नंतर मान्सून सक्रिय होतो मात्र अवकाळी पावसाने मे महिन्यातच जोर पकडावा आणि जिल्ह्याच्या 24 मंडलांमध्ये मुसळधार पाऊस व्हावा असा प्रकार गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच घडला आहे. त्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या संगम माहुली येथे असलेल्या कृष्णा व वेण्णा या नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. माहुलीचा काशी विश्वेश्वर घाट पाण्याखाली जाण्याची चिन्हे आहेत. साधारणत: जुलै-ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. मात्र यंदा मे महिन्यातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा शहराचे संस्थापक छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी देखील निम्मी पाण्याखाली गेली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कैलास स्मशानभूमीच्या पायऱ्यांना पाणी लागले आहे. येथे कुंडे सुस्थितीत आहेत. दरम्यान मे महिन्यात प्रथमच संगम माहुली घाट जलमय झाल्याने पाणी पाहण्यासाठी घाटावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्याच्या 23 मंडलांमध्ये मुसळधार पाऊस
पुढील बातमी
तासवडे एमआयडीसी येथे 6 कोटीचे कोकेन जप्त

संबंधित बातम्या