सातारा : शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचा तक्रार अर्ज जिल्हाधिकारी व सातारा नगरपालिकेत करुन ते प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करत खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुनेद सिराज काझी (रा. मल्हार पेठ, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मोहसीन मेहबूब सय्यद (वय 36, रा. सदरबझार, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार मोहसिन सय्यद यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, त्यांच्या वडीलांनी 1984 मध्ये सातारा पालिकेकडून 99 वर्षाच्या करारावर सदरबझार येथे घर बांधून घेतले आहे. याच जागेसंबंधी संशयित जुनेद काझी याने ते अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत गेल्या वर्षी जिल्हाधिकारी व सातारा पालिकेला तक्रार अर्ज केला. या तक्रार अर्जाची चौकशी सुरु होती. ऑगस्ट 2024 मध्ये जुनेद याने संबंधित प्रकरण मिटवायचे असल्यास 5 लाख रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संशयित जुनेद याने तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून त्याची व्हॉट्सअप व इन्स्टाग्रामवर स्टोरी केली. या स्टोरीमध्ये सरकारी प्लॉटवर अतिक्रमण, पालिकेशी पैशांची देवाण-घेवाण, प्रशासन गप्प असे म्हणत सोशल मिडीयावर अपलोड केले, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दि. 29 मे रोजी संशयित जुनेद याने भारतमाता, सदरबझार येथील चौकात तक्रारदार यांचा रस्ता अडवला. ’तुझ्या घराबाबत तक्रार अर्ज केला आहे. तुला घर वाचवायचे असेल तर तू मला 5 लाख रुपये दे. नाहीतर तुझे काहीही करुन घर पाडायला लावणार आहे,’ असे म्हणत धमकी दिली.