सातारा : मराठा साम्राज्याचे छत्रपती थोरले शाहू महाराज मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी व स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या समाधी संवर्धनाचा आराखडा तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. या आराखड्याचे प्रात्यक्षिक सादरीकरण शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. तसेच माहुली परिसरात अन्य घाटांच्या संवर्धनासह अन्य विकास कामांसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. समाधी संवर्धनांच्या प्रस्तावाला प्रशासकीय गती मिळाल्याने सातारा व कोल्हापूर येथील इतिहास प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीला खासदार शाहू छत्रपती, सातार्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, इतिहास संशोधक इंद्रजीत नागेशकर, उदय गायकवाड, हर्षल सुर्वे, राजू राऊत, प्रमोद पाटील, शुभम शिरहटी, सतीश कांबळे, चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, उदय नारकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या पूर्वी खासदार शाहू छत्रपती आणि मान्यवरांनी माहुली येथे जाऊन छत्रपती थोरले शाहू महाराजव महाराणी ताराराणी यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या समाधीला अभिवादन करून या तिन्ही समाधी स्थळांची यावेळी पाहणी करण्यात आली. त्यानंतर बैठकीमध्ये प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजीत नागेशकर यांनी या बैठकीमध्ये आराखड्याचे सादरीकरण केले.
छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या समाधी जवळ त्यांच्या जीवनावरील इतिहास शिलालेख कोरलेला असावा, समाधी जवळ त्यांचा अश्वारूढ पुतळा असावा, संगम माहुली येथील समाधी स्थळी वाहतुकीचा रस्ता किमान शंभर फूट असावा, अशा सूचना मांडण्यात आल्या. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नदीच्या दोन्ही तीरावर पूल करण्यात येणार आहे, त्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे, असे सांगितले. तसेच माहुली परिसर हा धार्मिक विधी तसेच राजघराण्यातील मान्यवर व्यक्तींच्या समाधींचा परिसर आहे. येथील धार्मिक पर्यटनाला वाव मिळावा याकरिता घाटांचे सौंदर्यीकरण व संवर्धन करावयाचे आहे. याचा स्वतंत्र प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले आहे. महाराणी ताराराणी यांच्या समाधी संवर्धन सुशोभीकरण कामांमध्ये लोकभावना लक्षात घेऊन काटेकोरपणे काम पूर्ण करण्यात येईल आणि विहित वेळेत ते काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन यावेळी संतोष पाटील यांनी दिले.