सातारा : ज्या व्यक्तीने गावाचे पोलीस पाटील पद भूषवले. मात्र, दुर्दैवाने त्या व्यक्तीचे निधन झाले. निराधार झालेल्या त्यांच्या विधवा पत्नीस राहण्यासाठी घर नाही. आजमितीस पाटलाची पत्नी तिच्या पोराबाळासह दुसऱ्याच्या पत्रावजा शेडमध्ये राहत आहे. तिने घरकूल मिळावे म्हणून ग्रामपंचायतीकडे मागणी करुन देखील दहा वर्षांपासून तिला घरकूल मिळत नाही याची दखल सातारा जिल्हा प्रशासन घेणार आहे की नाही असा आर्त टाहो ती फोडत आहे. मात्र, कोणीही तिला न्याय देत नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील आकले गाव. भिवाजी सुळके या हे पोलीस पाटील होते. दुर्देवाने आठ वर्षांपूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सारा गाव हळहळला. त्यानंतर दु:खातून सावरत भिवाजी सुळके यांच्या पत्नी मंगल सुळके या पोराबाळांसह घराला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पतीचे निधन झाल्यानंतर पोलीस पाटलाच्या या विधवा पत्नीने त्यांच्या कुटुंबासाठी घरकुलाचे छप्पर डोक्यावर उभे रहावे यासाठी आकले ग्रामपंचायतीकडे नोंद केली होती. मात्र, आठ वर्षे झाली त्यांना घरकूल मंजूर झालेले नाही व त्या पोराबाळांसह दुसऱ्याच्या जागेत पत्रावजा शेडमध्ये रहात आहेत.
मुळात पाटील हयात असतानाच त्यांनी घरकूल योजना मिळावी म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीकडे नोंद केली होती. त्यांचे निधन झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून हे कुटुंब सावरत असताना पतीने केलेल्या नोंद केलेल्या घरकूल योजनेसाठी नावाबाबत त्यांची विधवा पत्नी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय, सातारा पंचायत समितीत जावून अधिकाऱ्यांना भेटली. मात्र, तुमचे नाव प्रतिक्षा यादीत असल्याचे त्यांना सांगण्यात येत आहे.
याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीत सध्याच्या ग्रामसेवकांकडे चौकशी केली असता. सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांनी माझ्याकडे घरकूल योजनेची फाईल नाही. त्यामुळे तुमचे नाव त्यात आहे की नाही हे मी सांगू शकत नाही तुम्ही पंचायत समितीत घरकूल देणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,. मी देवू शकत नाही असे सांगितले. त्यावर पाटलांच्या विधवा पत्नीच्या भावाने याबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे ग्रामपंचायत व ग्रामसेवकाकडून मिळाली आहेत. सध्या कर्तव्यावर असलेल्या ग्रामसेवकांना याबाबत काहीच माहिती नाही. ते ऑनलाईन सर्व्हे झालाय. मात्र घरकूल लाभार्थी यादीच त्यांच्याकडे नसल्याचे सांगत आहेत. जर पाटील हयात असतानाच त्यांनी ग्रामपंचायतीकडे घरकूलाची मागणी केली असेल तर आठ ते दहा वर्षे होवून देखील त्या कुटुंबाला रहावयास घर नसताना त्यांना घरकूल का मिळत नाही याची जिल्हा प्रशासनाने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ग्रामपंचायत व ग्रामसेवक अनभिज्ञ
याबाबत सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांचा ऑनलाईन सव्हे झाला असल्याचे सांगितले. मात्र ती घरकूलासाठी प्रतिक्षा यादीत असलेल्यांची यादीच त्यांच्याकडे उपलब्ध नाही. ती गुप्त आहे. एखाद्या कुटुंबाला जर अशा प्रकारे घरकूल मिळण्यासाठी एवढी वर्षे प्रतिक्षा करावी लागत असेल तर ती ग्रामपंचायत, तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक नेमके कोणते कर्तव्य बजावत होते याची चौकशी होण्याची गरज आहे.