म्हसवड : पंढरपूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. नासपच्या पाठपुराव्याने स्मारकाला रेल्वेची जागा मिळाली असल्याची माहिती नासपचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी दिली.
पंढरपूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारकाबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला विविध शिंपी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी नामदेव समाजोन्नती परिषद सोडून इतर संघटनांना दि. 9 एप्रिलपर्यंत प्रकल्पाचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच जुलै महिन्यात आषाढी वारीपर्यंत श्री संत नामदेव महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमीपुजन करण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.
या बैठकीत नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी श्री नामदेव स्मारक प्रकल्पावर परिषद सन 2014 पासून काम करत असून वेळोवेळी शासनाशी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी रेल्वे बोर्डाची जागा महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शिंपी समाजातील इतर सर्व संघटनांनी नामदेव समाजोन्नती परिषदेच्या मागे उभे राहून शिंपी समाजाची एकी दाखवावी, असे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी यांना नामदेव समाजोन्नती परिषदेचे सहसचिव प्रविण शित्रे यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझाईन कन्सल्टंट व आर्किटेक्ट नासपतर्फे या प्रकल्पावर काम करणार असल्याचे सांगून त्यांच्याबरोबर त्वरित बैठक घेण्याची मागणी केली.
नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी इतर शिंपी संघटनांनी प्रकल्प डिझाईनमध्ये काही सुचना असतील तर त्याबाबत नामदेव समाजोन्नती परिषद निश्चित चर्चा करेल, असे सांगितले. या बैठकीला पंढरपूर येथील वसंतराव पिसे, माळशिरस येथील अशोक बोंगाळे, अनंता घम, राजेश केकडे, नामदेव क्षत्रीय एकसघांचे अध्यक्ष महेश ढवळे, सोलापूर बहुउद्देशीय शिंपी समाजाचे अध्यक्ष युवराज चुंबळकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. प्रास्तविक जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले.
याप्रसंगी जयवंत लाड, अशोक माने, सुरेश थोरवडे, साधू सपकाळ, सीताराम सुतार, शिवाजी जाधव, संजय कुंभार, एकनाथ लाड, सखाराम साळुंखे, शंकर सपकाळ, महादेव वाघमारे, गजराबाई खराडे, हिराबाई यादव, पारुबाई जाधव यांच्यासह कोयना धरणग्रस्त उपस्थित होते.