सातारा : 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे 1 ते 4 जानेवारी 2026 कालावधीत होणार आहे. साहित्य संमेलनाशी सबंधित उर्वरित कामे 31 डिसेंबरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी कालवधीत शाहू स्टेडियम, सातारा येथे होणार आहे. या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची पहाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी केली. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
साहित्य संमेलनातून सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती व्हावी यासाठी पर्यटनस्थळांच्या माहितीची गॅलरी तयार करावी, अशा सूचना देवून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, साहित्य संमेलन सातारा येथे होत असल्याने जगभरातील नागरिक येणार आहेत. नगर परिषदेने साहित्य संमेलन कालावधीत शहर स्वच्छ ठेवण्याबरोबर सुशोभीकरणाची कामे तात्काळ पूर्ण करावीत.
पोलीस विभागाने शहरात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने विना अडथळा पार्कींग होतील यासाठी नियोजन करावे. साहित्य संमेलनाच्या स्थळी कचरा होणार नाही यासाठी अधिकचे मुनष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी दिल्या.