सातारा : सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीसाठी मी अथक नऊ वर्षे प्रयत्न केले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही दलालांच्या आग्रहामुळे आयात उमेदवार आमच्यावर लादला गेला. त्यामुळे आमच्यातील शिवसैनिक दुखावला ज्यावेळी शिवसैनिकांच्या सुखदुःख प्रसंगी वरिष्ठांच्या मदतीची गरज होती तेव्हा कोणीच मदतीला धावले नाही, जर वरच्या पातळीवरून रसद मिळणार नसेल तर कार्यकर्त्यांनी दाद कोणाकडे मागायची? अशी तळमळ शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
सचिन मोहिते यांनी नुकताच फलटण येथील मेळाव्यात राष्ट्रवादी अजित दादा पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र का केला ही भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, "शिवसैनिकांना सातत्याने प्रोत्साहित करणे वेळोवेळी जनआंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेला समोर आणणे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणे, ही भूमिका आम्ही प्रामाणिकपणे नऊ वर्षे पार पाडली. पश्चिम महाराष्ट्र संपर्क मंत्री यांचा प्रोटोकॉल आम्ही कधीही तोडला नाही, ना कधी त्यापेक्षा वरिष्ठ पातळीवरील मंत्र्यांशी संपर्क केला नाही. ज्यावेळी विधानसभा निवडणुकींसाठी शिवसेनेचा कट्टर उमेदवार तयार असताना राजकीय तडजोडी मध्ये आमच्यावर आयात उमेदवार लादला गेला. तसेच त्याचा प्रचार करावा लागेल अशी सक्ती करण्यात आली, मात्र आमच्यासारख्या शिवसैनिकांना ते पटले नाही. कट्टर शिवसैनिकाला संधी देण्याऐवजी आयात उमेदवार आमच्या पुढे उभे करणे ही बाब कुठेतरी खेद वाटणारी होती. तसेच फायनान्स कंपन्यांच्या विरोधात ज्यावेळी आम्ही आंदोलन केली, तेव्हा आम्ही बेधडक त्यामध्ये उतरलो सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय दिला. मात्र कायदा हातात घेतला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल झाले. त्या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर मला खूप धावपळ करावी लागली. वरिष्ठ पातळीवरून कोणतीही मदत आम्हाला मिळाली नाही, जर वरिष्ठ नेते आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर आम्ही कार्यकर्त्यांनी कोणाकडे दाद मागायची असाच सवाल त्यांनी केला.
त्यामुळे तेव्हाच पक्ष बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला होता राष्ट्रवादी अजितदादा गटांमध्ये सध्या आम्ही प्रवेश केला आहे. अजित दादा पवार हे राज्यव्यापी आणि सर्वमान्य नेतृत्व आहे त्यांच्या माध्यमातून साताऱ्यातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने सक्रिय राहणार असल्याचे सचिन मोहिते यांनी सांगितले.