सातारा : सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूनगर भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळताना बरीच यातायात करावी लागत आहे. वारंवार होणार्या खंडित वीज पुरवठ्यामुळे येथील टाक्यांना लेवल मिळत नसल्याने ऐन पावसाळ्यात शाहूनगरवासियांना टँकरचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. या संदर्भात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक लावून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी दिले.
शाहूनगरवासीयांनी आज दुसर्यांदा वाघमारे यांना त्यांच्या केबिनमध्ये घेराव घालून पुन्हा एकदा जाब विचारला. पंधरा दिवसापूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी दिले होते. मात्र त्यात कोणताच फरक न पडल्याने शाहूनगरवासियांनी पुन्हा मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक दिली. त्यावेळी खंडित वीजपुरवठा बंद पडणार्या विद्युत मोटारी यामुळे पाणीपुरवठ्याला अडथळा येत असल्याचे कारण देण्यात आले. जगतापवाडी, शिवनेरी कॉलनी, रामराव पवार नगर, गोडोली, बागडी वस्ती या भागांना ऐन पावसाळ्यात टँकरचे पाणी मागवावे लागत आहे, हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही, अशी तक्रार यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. वाघमारे यांनी नागरिकांचा रोष समजावून घेत त्यांना पुन्हा एकदा आश्वासन दिले. जिल्हाधिकारी संतोष पाटील व एम एस ई डी एल म्हणजेच वीज विभागाचे कार्यकारी अभियंता यांची तातडीने बैठक लावून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी एडवोकेट सचिन तिरोडकर, नितीन सूर्यवंशी, माधव मेंढेगिरी, अमोल पाटुकले, अमोल नलावडे, प्रकाश घुले, संतोष घुले, उमेश गोरे, रमेश जमदाडे, रवींद्र डांबे, मोहन पवार, सतीश यादव, अभिजीत बारटक्के, रवी पवार, राजा जाधव, निखिल माळी, प्रसन्न अवसरे, जगताप काका इत्यादी उपस्थित होते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
