पुनर्रचनेद्वारे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला बळकटी

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 09 August 2024


सातारा : मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारे कल्याणकारी निर्णय शासन घेत आहे. मराठा समाजातील तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे याकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या मंडळाला कायदेशीर बळकटी दिल्यामुळे त्याचे कार्यक्षेत्र वाढले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने एक लाख मराठा उद्योजक संकल्प कृती मेळावा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यावेळी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याचे काम महामंडळाने केले आहे, ही बाब अभिनंदनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. मराठा समाजात नोकरी देणारे उद्योग निर्माण करण्यासाठी महामंडळाची पुनर्रचना केली आहे. बँकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटींचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. जवळपास 825 कोटी व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. महामंडळाने बँकांच्या सहकार्याने आणखी पाच लाख उद्योजक बनवावेत आणि या उद्योजकांनी 25 लाख नोकर्‍या द्याव्यात, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. शासनाने 1600 कोटी रुपये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला आहे. 507 विविध अभ्यासक्रम मुलींसाठी विनामूल्य करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी एक लाख उद्योजकांचा निर्मितीचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगत याबद्दल आनंद व्यक्त केला. मराठा समाजात व्यावसायिक निर्माण करण्यात महामंडळाचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील शासकीय, सहकारी, एनबीएफसी बँकांनी मिळून साडेआठ हजार कोटीचे कर्ज वितरण मराठा समाजातील उद्योजकांना केले आहे, असे ते म्हणाले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, महामंडळाने केलेल्या कर्ज वितरणात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वाटा महत्वपूर्ण आहे. मराठा समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह सातार्‍यात उभे करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सातारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दुरनियंत्रक प्रणालीद्वारे केले. यावेळी लाभार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बाजार समितीच्या प्रशस्त संकुलाला राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करणार
पुढील बातमी
जबरी चोरी प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या