सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्ता सूत्राचा गुंता संपलेला नाही. भारतीय जनता पार्टीने आपली राजकीय रणनीती गतिमान केली असून सातारा जिल्ह्यात त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने आपल्या जिल्हा परिषद सदस्यांची मनोगते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली असून सत्तेवर जाण्याचा कोणताही निर्णय हा वरिष्ठांशी बोलूनच घेतला जाईल असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही मी इतका मोठा नाही जे निर्णय होतील ते वरिष्ठांशी बोलूनच होतील.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने ताकतीने चांगल्या जागा निवडून आणल्या. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तरी झेडपी ज्यांना पुढील पाच वर्षे उत्तम काम करायचे आहे आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यायचे आहे त्यांच्यासोबत जाण्याची आमची स्पष्ट इच्छा आहे .याबाबतचा सर्व राजकीय अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे. आमच्या 15 जागा निवडून आले असून मतदारांनी आमच्यावर दाखविला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. सत्तेत सहभागी होताना तांत्रिक बाबींमध्ये शिवसेना पक्षाने मला व्हीपचा अधिकार दिला आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने साताऱ्यात गांधी मैदानावरून चालताना एका बाजूलाशिवेंद्रसिंहराजे भोसले व दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे चालत होते आणि मला मधोमध चालण्यास सांगितल्यावर खरंतर मला भीती वाटत होती अशी कोपरखळी देसाई यांनी भाजपच्या दोन्ही नेत्यांना मारली.