जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची पुन्हा अदलाबदल; व्यवस्थापनाबद्दल तीव्र संताप

​शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईकांचे धरणे आंदोलन; दोन कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

by Team Satara Today | published on : 31 March 2026


​सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना त्यांची अदलाबदल झाल्याने रुग्णालयात संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

​सोनगरवाडी (ता. वाई) येथील आनंद ओव्हाळ (वय २६) यांनी विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर आरळे येथील सुरेश मस्कु खोमणे (वय ५१) हे मागील तीन दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान या दोघांचेही निधन झाले. रात्रीच दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले होते; मात्र सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना गोंधळ झाला. मृताचा चेहरा न दाखवताच मृतदेह ताब्यात देण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.

​रुग्णालयाने बॉडी ताब्यात दिल्यानंतर आरळे येथील नातेवाईकांनी सुरेश खोमणे समजून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू केले. दरम्यान, मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे लक्षात येताच अंत्यसंस्कारासाठी पेटवलेली चिता विझवण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे नातेवाईक आक्रमक झाले असून, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

​या सर्व प्रकारानंतर सोनगरवाडी येथील नातेवाईकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांशी जोरदार खडाजंगी केली. मृतदेहाचा चेहरा न दाखवल्यामुळेच हा गंभीर प्रसंग ओढवल्याचा दावा करत नातेवाईकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना समोर आणण्याची मागणी लावून धरली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून, याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मृतदेहाचा चेहरा दाखवूनच ओळख पटवण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, नेमकी चूक कुठे झाली याचा तपास आता रुग्णालय प्रशासन करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती स्थगित; विभागीय सहनिबंधकांचे आदेश
पुढील बातमी
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांबाबत विलंब नको : सुनील शिखरे

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी