फलटण : फलटण पंचक्रोशीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात अस्थिशल्य चिकित्सक म्हणून प्रख्यात डॉ. प्रसाद जोशी यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पुणे, मुंबईच्या धर्तीवर फलटण येथे सर्व वैद्यकीय साधने सुविधांनी सुसज्ज जोशी हॉस्पिटल प्रा. लि., ची उभारणी आणि तेथे सुरू असलेल्या सिटीस्कॅन, एमआरआय, रोबोटीक या सुविधा ग्रामीण भागातील हॉस्पिटलसाठी प्रेरणादायी असून गेल्या २५ वर्षांपासून डॉ. जोशी यांचे यांचे सुरु असलेले वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय असल्याचे निदर्शनास आणून देत आमच्या मंगेशकर हॉस्पिटललाही त्यांनी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा ज्येष्ठ पार्श्वगायिका श्रीमती उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.
विद्या वैभव प्रकाशन, पुणे यांच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा उषा - वैभव पुरस्कार डॉ. प्रसाद जोशी यांना श्रीमती उषा मंगेशकर यांच्या हस्ते सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथील दिमाखदार सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे, पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुर्यवंशी बेडके, पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली भोसले, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी भोसले, विद्या वैभव प्रकाशनचे अध्यक्ष बकुळ पराडकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, पोलिस निरिक्षक अरविंद काळे व हेमंतकुमार शहा, तहसिलदार डॉ. अभिजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. फलटण शहरासह शेजारच्या तालुक्यातील आणि फलटण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटणकर रसिकांनी आपल्याला भरभरुन प्रेम दिले
आतापर्यंत आपण ३ वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने फलटणला आल्याचे निदर्शनास आणून देत पुण्यामध्ये मोठे मंगेशकर हॉस्पिटल असून पुण्याच्या जवळच १२ कि. मी. वर अत्याधुनिक सर्वसोयींनी युक्त असे लता दिनानाथ हॉस्पिटल तसेच संगीत क्षेत्रातील मोठे म्युझीयम उभारण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करतानाच हॉस्पिटलमध्ये रुग्ण संख्या वाढणे हे चांगले लक्षण नाही, परंतू रुग्ण व्याधीमुक्त होवून जाणे हे चांगले लक्षण असल्याचे श्रीमती उषा मंगेशकर यांनी आवर्जून सांगितले.
फलटण संस्थान आणि मंगेशकर कुटुंबीय यांचे फार जुने संबंध
आपले आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब यांनी संस्थान काळात आणि त्यानंतरही कर्तबगार आणि विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींना फलटण संस्थानमध्ये आणून सामाजिक प्रबोधनाचे काम करताना इथल्या सर्वसामान्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचार त्यांचे आदर्श यांचे कर्तुत्व समजावे यासाठीच त्यांचे हे प्रयत्न असल्याचे निदर्शनास आणून देत फलटण प्रमाणेच सातारा जिल्हयातील औंध संस्थानही अशा प्रकारचे काम करत असल्याचे निदर्शनास आणून देत अशीच काहीसी परंपरा बकुळ पराडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनुबंध कला मंडळाच्या माध्यमातून सुरु केली आहे, त्यांचे हे कार्य निश्चित कौतुकास्पद असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले. फलटण संस्थान आणि मंगेशकर कुटुंबीय यांचे फार जुने संबंध आहेत. आपले ऋणानुबंध कायम रहावेत यासाठी मंगेशकर कुटुंबीय आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी फलटणचा राजवाडा पाहण्यासाठी आवर्जुन यावे, असे निमंत्रणही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिले.
पद्मिनी कोल्हापुरे यांनी सारे काही विसरुन आता राजकारणात यावे : आ. श्रीमंत रामराजे
आम्ही राजकारणी इतके वाईट नसल्याचे सांगत पद्मिनी कोल्हापुरे यांनी सारे काही विसरुन आता राजकारणात यावे अशी सूचना करुन आ. श्रीमंत रामराजे म्हणाले, तुमच्या सारख्या व्यक्तींची राजकारणात आवश्यकता आहे, ज्यांना पॉवर पॉलिटिक्स मध्ये इंट्रेस्ट नाही, परंतू सार्वजनिक आयुष्यात काही तरी करायची इच्छा आहे, त्यांनी निश्चित राजकारणात यावे. राजकारण, सत्ता, हॉस्पिटल यामधील सेवा माणूसकी ठेवून करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करतानाच काही माणसे आहेत की, व्यवसायाचा धंदा करत नाहीत तर धंद्याचा व्यवसाय करतात असे स्पष्ट मतही यावेळी आ. श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.
अतिरिक्त पोलिस अधिक्षक कडूकर यांचे कौतुक
आजकाल पोलीस खात्याला घाबरायची वेळ आली आहे, तथापि निवृत्त पोलीस कमिशनर मीरा बोरवणकर यांच्यानंतर कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुम्हीच आहात असे कौतुक अतिरिक्त पोलिस अधिक्षक कडूकर यांचे करताना अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक संध्याकाळ घालवायला मिळाली याचा निश्चित आनंद असल्याचे सांगत डॉ. जोशी यांचे अभिनंदन करुन त्याच्या पुढील वाटचालीस आ. श्रीमंत रामराजे यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रसन्न जोशी म्हणाले, माझ्या सासुरवाडी कडील आजोळी मला येता आले, याचा मला खूप आनंद आहे, ऋणानुबंध आता स्नेहानुबंधामध्ये रुपांतरित झाला असल्याने माझे एक नवे नाते फलटणशी जोडले गेले आहे. संध्याकाळची वेळ, संगीताची मैफल आणि मान्यवरांसह खूप मोठा जनसमुदाय हे दृश्य अलीकडे धुसर होत चालले आहे. सद्या लोक टी व्ही बघत नाहीत, तर ते आता डिजिटल होत चालले आहेत. अशा स्थितीत एक मराठी माणूस दुसर्या मराठी माणसाचा चक्क कौतुक करतो, सत्कार करतो ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.
पुरस्कार आपली आई व हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना समर्पित
मंगेशकर कुटुंबीयांकडून हा पुरस्कार मिळाल्याने जीवनाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त करीत डॉ. जोशी म्हणाले, हा पुरस्कार आपली आई व हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना समर्पित करतो. पुरस्काराबद्दल आणि या सोहळ्यास मोठ्या संख्येने मान्यवरांसह फलटणकरांची उपस्थिती लाभल्याबद्दल डॉ. जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पुणे - मुबईमध्ये सर्व सोयी सुविधा असतानाही फलटण सारख्या निमशहरी भागात आरोग्य सेवेसाठी आपले आयुष्य घालवणारे डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार बकुळ पराडकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले, त्यापूर्वी त्यांनी सर्व उपस्थित यांचे अनुबंध कला मंडळाच्यावतीने स्वागत केले.
अनुबंध कला मंडळातर्फे जोशी हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील सौरभ दफ्तरदार यांचा 'म्युझिकल आरडी' हा सदाबहार संगीत गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याचा शुभारंभ ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी या सर्वांनी डॉ. प्रसाद जोशी यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरवात श्री गणेश वंदना तसेच मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुधोजी हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले यांनी, समारोप समारोप व आभार प्रदर्शन डॉ. प्राची जोशी यांनी केले.