सातार्‍यात मंगळवारी उद्योजकांचा महासंवाद

by Team Satara Today | published on : 23 July 2023


सातारा : सॅटर्डेचा ग्लोबल ट्रस्ट सातारा विभागाच्यावतीने मंगळवार दि. 25 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उद्योजकांचा महासंवाद हा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मराठा उद्योजक घडवणे हा या मागील उद्देश असून या कार्यक्रमास जिल्हयातील 800 हुन अधिक उद्योजक सहभागी होणार असल्याची माहिती ट्रस्टचे चेअरमन किशोर सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
प्रेरणादायक असलेले माधवराव भिडे यांनी 79 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर सॅटर्डेचा ग्लोबल ट्रस्टची महाराष्ट्रात 2000 साली सुरुवात केली आहे. मराठी उद्योजक निर्माण करावा, या उद्देशाने एका चॅप्टरमध्ये 50 सदस्य महिन्यातून दोनवेळा एकत्र येवून चर्चा व मार्गदर्शन करीत आहेत. महाराष्ट्रात 4 हजारहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत. हा ट्रस्ट कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन वा मार्केटिंग करीत नाही, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
एकमेका सहाय्य करु, अवघे होवू श्रीमंत, ब्रिदवाक्यानुसार संस्था वाटचाल करीत आहे. राज्यातील सर्व उद्योजक एकत्र करणे हा या मागचा हेतू आहे. या उदयोजक संवादातून बिझनेसची देवाण-घेवाण होते. या ट्रस्टच्या माध्यमातून सातार्‍यात आतापर्यंत 200 हुन अधिक छोटे-मोठे उद्योजक घडले आहेत. अजून उद्योजक घडावेत यासाठी मंगळवार दि. 25 जुलै रोजी उद्योजकांचा महासंवाद हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे होणार आहे. यात टी अँड टी इन्फ्राचे शिवराम थोरवे, पितांबरी प्रोजेक्ट्चे रवींद्र प्रभुदेसाई हे मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रेरणादायी वक्ता म्हणून शरद तांदळे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत होणार असून याला जिल्हयातील उद्योजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी इव्हेंट हेड प्रणित कुंदल, संदीप जाधव, संतोष खटावकर, संकेत पवार, संदीप पंडितराव, सचिन कुंभार, विशाल रहाटे, अजय शिंदे, निरंजन शेजवळकर, सुहासिनी निकम, रोहित शिंदे व कृष्णात मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
खटावच्या जीवन इंगळे यांना श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार जाहीर

संबंधित बातम्या