फलटण : श्री क्षेत्र पंढरपूरहून आळंदीकडे निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण येथील रविवार पेठेतील श्री संत नामदेव महाराज शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये विसावला. सोहळ्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी स्वागत केले, तसेच महाराजांच्या पादुकांची सपत्निक आरती केली. या वेळी फलटण शहरासह तालुक्यातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पौर्णिमेला पंढरपूरहून निघून श्री क्षेत्र आळंदी येथे आषाढ वद्य दशमीला जात असते, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. वाटेमध्ये फलटण येथील शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असतो. ही परंपरा गेली अनेक वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. सध्या या पालखीसोबत जवळपास दोन हजार वारकरी सहभागी झाले आहेत.
या वेळी विश्वस्थ चैतन्य महाराज कबीर उपस्थित होते. भक्तांना पालखीच्या दर्शनाचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, महिला मंडळाचे पदाधिकारी, नामदेव समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी यांनी उत्तमरीतीने केले.
सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते सायंपूजा झाली. फलटणला संत ज्ञानेश्वरांच्या पालखी बरोबरच जगद्गुरू तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज ओतूर तसेच श्री संत जगनाडे महाराज यांच्याही पालखी सोहळ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.