मलकापूर : येथील काँग्रेसचे माजी दोन नगरसेवक चुलते आणि पुतण्यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. येथील माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या चांदे चुलत्या- पुतण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना धक्का मानला जात आहे. त्यामुळे क रा ड दक्षिण व मलकापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडले.
येथील पालिकेचे माजी बांधकाम सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे व त्यांचे पुतणे माजी नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सतीश चांदे, धनाजी देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत प्रदेश कार्यालयात आमदार डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अतुल सावे, आमदार डॉ. भोसले, समाधान अवताडे यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रशांत चांदे हे पालिकेचे माजी नगरसेवक असून, शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत होते. शहर काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे हे पालिकेत तब्बल १५ वर्षे नगरसेवकपदी राहिले आहेत. त्यापैकी १० वर्षे ते बांधकाम सभापती, शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत राहिले. पालिका होण्यापूर्वी १२ वर्षे ते मलकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. चांदे कुटुंबीयांचा भाजप प्रवेश माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.