सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील कोयना बॅक वॉटरच्या कांदाटी खोऱ्यातील जैव विविधतेचा एक महत्वाचा घटक असलेल्या बांबूच्या वापरातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मौजे सालोशी येथे पाच दिवसीय बांबू हस्तकला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्री-मूव्ह कंपनी आणि ऊमेद यांच्या सहकार्याने, आय.डी.बी.आय बँकेच्या ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रशिक्षणाला स्थानिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
महाबळेश्वर तालुक्यातील सालोशी येथे दि. २७ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान बांबू हस्तकला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटन प्रसंगी ‘उमेद’च्या क्लस्टर समन्वयक सौ. सीमा शिंदे, आय.डी.बी.आय बँकेचे समन्वयक साळुंखे आणि सालोशी गावाच्या सरपंच सौ. नंदा चव्हाण उपस्थित होत्या. कांदाटी खोरे प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे इंद्रजीत यादव, रोहन जंगम व विजय आखाडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बांबूच्या विविध प्रजातींबद्दल माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांना बांबूच्या ६ प्रमुख प्रजातींचे विशेष गुणधर्म आणि त्यांचा विविध क्षेत्रातील वापर शिकवण्यात आला.
प्रशिक्षणामध्ये सहभागी लाभार्थ्यांना बांबूपासून वॉल हंगिंग, मोबाईल स्टँड, फुलदाणी, कॉफी मग, आकाशकंदील, चहाचे ट्रे आणि शोभेच्या वस्तू बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक लाभार्थीने या वस्तू स्वतःच्या हाताने तयार करण्याचा आनंद घेतला. प्रशिक्षणार्थ्यांनी या कलेचा वापर करून कांदाटी खोऱ्यातील पर्यटकांना विक्रीसाठी आकर्षक वस्तू तयार करण्याचे आश्वासन दिले.
प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये सहभागी नागरिकांनी अधिक सखोल आणि विस्तृत प्रशिक्षणाची मागणी केली. प्रशिक्षण संपल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी कार्यक्रमाबद्दल सकारात्मक अभिप्राय दिला.