सातारा : साताऱ्याच्या छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 100 कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत. या महाविद्यालयासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही. हे महाविद्यालय देशामध्ये एक आदर्श वैद्यकीय महाविद्यालय म्हणून नावारूपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे स्पष्ट आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, 500 खाटांच्या निकषाची पूर्तता करण्यासाठी स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करून घेण्यात आले. त्यानंतर लागणाऱ्या विस्तीर्ण जागेचा प्रश्न चर्चा करून सोडवण्यात आल्यावर कृष्णा नगर येथील विस्तीर्ण जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून आज महाविद्यालयाचे चौथे वर्ष सुरू आहे. येत्या दोन वर्षात या ठिकाणी पदव्युत्तर पदवी ही सोय सुद्धा उपलब्ध केली जाणार आहे. दरम्यानच्या काळात या महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेण्यात आला.
वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झालेले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला विशेष सहाय्य म्हणून केंद्राकडून पाठपुरावा करून शंभर कोटी रुपये प्राप्त करून घेण्यात आले असून सदरची रक्कम महाविद्यालय व्यवस्थापनाकडे जमा झाली आहे. केंद्राकडून एकाच वेळी इतका मोठा निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच घटना आहे. या सहाय्य निधीमधून महाविद्यालयाची इमारत, निवास वसतिगृह इत्यादी कामांसाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामात असाधारण विलंब होऊ नये यासाठी आमचे सातत्याने लक्ष आहे. महाविद्यालयाचे बांधकाम जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असे उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.