स्वबळ आजमावणार्‍या भाजप विरोधात स्वकियांची मोट बांधणार - ना. मकरंद पाटील; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवू

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत. पालककमंत्री असताना तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांचे सातत्याने जिल्ह्यावर लक्ष राहिले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून हा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी आहे. पवार साहेब अजितदादांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. महायुतीमधील आमचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते स्वबळावर लढण्याचे सूतोवाच करत आहेत. अशा परिस्थितीत स्वकियांची मोट बांधून आम्ही निवडणुकीला सामोरे जावून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवू, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ना. पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या 200 पेक्षा जास्त उमेदवारांनी दोन दिवसांत राष्ट्रवादीतर्फे मुलाखती दिल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सकारात्मक भावना जनतेमध्ये आहे. भाजप हा महायुतीमधील प्रमुख पक्ष आहे. मात्र, त्यांच्या नेत्यांनी स्वबळावरच निवडणूक लढण्याचं सुतोवाच केले आहे. अशा परिस्थितीत जी मंडळी आमच्यासोबत येण्याचे मान्य करत आहेत, अशा समविचारी पक्षांशी चर्चा करुन समन्वयाने पुढे कसे जाता येईल, अशी वाटचाल आमची राहिल.

ना. जयकुमार गोरे यांनी फलटण येथे केलेल्या टिकेबाबत छेडले असता ना. पाटील म्हणाले, निवडणुका म्हटल्यावर टीका होणार, हे चालत राहणार आहे. ना. गोरे यांनी केलेल्या टीकेची मी त्याची माहिती घेतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर एकाच चिन्हावर लढणार का? असे विचारले असता निवडणुकीला सामोरे जाण्याबाबतची चर्चा झाल्यानंतर एकत्र येवून कुठल्या चिन्हावर लढायचे? हे ठरविण्यात येईल, असेही ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे प्रसारित होणाऱ्या जाहिरातीचे प्रमाणन करणे अनिवार्य - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
208 उमेदवारांनी दिल्या भाजपकडे मुलाखती; उत्तम जनसंपर्क जनाधार असलेले उमेदवार देणार - जिल्हाध्यक्ष अतुल भोसले

संबंधित बातम्या