सातारा : शहरात गुलाबी थंडीची चाहूल लागताच सातारकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा असणारा 'आवळा' मंडईत दाखल झाला आहे. विशेषतः मोरावळ्यासाठी खवय्यांची पहिली पसंती असलेल्या आणि आकाराने मोठ्या असणाऱ्या 'जंबुश्वरी' जातीच्या देशी आवळ्याची सदाशिव पेठेतील भाजी मंडईत बंपर आवक झाली आहे. विशेष म्हणजे आवळ्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलोपर्यंत गडगडल्याने गृहिणींची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र आहे.
सातारा जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली की, आहारात आपोआपच बदल होतात. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी मानला जातो. सध्या सातारा परिसरातील बाजारपेठांमध्ये फलटण तालुक्यातील गिरवी या दुष्काळी पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर आवळ्याची आवक सुरू झाली आहे. या भागातील हवामान आवळ्यासाठी पोषक असल्याने येथील आवळा दर्जेदार आणि चविष्ट असतो.
सध्या मंडईत दाखल झालेला 'जंबुश्वरी' हा देशी वाण त्याच्या मोठ्या आकारामुळे आणि रसाळ गरमुळे मोरावळा बनवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. दरवर्षी गृहिणी वर्षभराची बेगमी म्हणून आणि आरोग्यासाठी टॉनिक म्हणून मोरावळा बनवण्याला प्राधान्य देतात. यंदा आवक चांगली असल्याने आणि दरही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे (६० ते ७० रु. किलो) असल्याने गृहिणींचा कल आवळा खरेदीकडे वाढला आहे.
आरोग्याचा 'बुस्टर डोस'
थंडीच्या दिवसांत कफ आणि पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी, तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आवळा हे वरदान आहे. त्यामुळे केवळ मोरावळ्यासाठीच नव्हे, तर लोणचे, सुपारी आणि ज्यूससाठीही सातारकर नागरिक किलोभर आवळा खरेदी करताना दिसत आहेत.
फोटो : अतुल देशपांडे, सातारा.