दहिवडी : माणच्या शेतकर्यांची इंच न इंच जमीन भिजली जाईल, असे पाण्याचे नियोजन केले आहे. तसेच दहिवडी ही मतदार संघाची राजधानी आहे. याचा विचार करुन विकासाचा बॅकलॉक भरुन काढण्यासाठी मागेल तेथे काम दिले जाईल, फक्त कामे दर्जेदार करा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दहिवडीमध्ये उभारला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
दहिवडी येथील शॉपिंग कॉम्प्लेक्ससह अनेक प्रभागातील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा नीलम जाधव, सौ. सोनिया गोरे, शिवप्रसाद उद्योग समूहाचे चेअरमन शरद मोरे, नगरसेविका सुरेखा पखाले, अतुल जाधव, भाजपचे दहिवडी मंडल अध्यक्ष गणेश सत्रे, म्हसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड, दिलीप जाधव, सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, अर्जुन काळे, बाळासाहेब सावंत, महेश जाधव, मुख्याधिकारी संदीप घार्गे नगरसेवक रुपेश मोरे उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, विकासाचे काम आता खर्या अर्थाने सुरू झाले आहे. दहिवडीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, शेखर गोरे यांचे समर्थक सर्वांनी साथ दिली. त्यामुळे दहिवडीमध्ये भाजपची सत्ता आली. सत्ता असो वा नसो प्रत्येक गावासाठी विकास निधी आतापर्यंत दिला. दहिवडीतील प्रत्येक शेतकर्याच्या बांधावर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. माण-खटावच्या पाण्याला कोणताही कायदा आडवा येणार नाही. गरज पडली तर कायदा बदलू. तालुक्यातील इंच न इंच शेती भिजणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ना. गोरे पुढे म्हणाले, दहिवडीमध्ये महापुरुषांच्या नावाने चौकाचौकात बोर्ड लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. दहिवडीमधील सर्व बोर्ड काढून टाकू या. महापुरुषांना जाती पातीमध्ये अडकवू नका. महापुरुषांची कार्ये ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. महापुरुषांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. त्यांना जातीपातीमध्ये आपण अडकवून न ठेवता, महापुरुषांची ताकत व प्रेरणा घेऊन काम करू या, असे आवाहन त्यांनी केले.
नीलम जाधव म्हणाल्या, राज्यामध्ये ना. जयकुमार गोरे यांनी अलौकिक काम केले. पंढरीच्या वारीनिमित्त स्वच्छता केली. त्याचबरोबर वारीचे योग्य नियोजन केले. वारकर्यांची मनोभावे सेवा केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अभिनंदनाचा ठरावही विधानसभेत झाला. ही बाब माणदेशी माणसाला गौरवास्पद आहे. ना. जयकुमार गोरे यांनी दहिवडीच्या विकासासाठी मोठा निधी दिला असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक ज्येष्ठ नेते अॅड. भास्करराव गुंडगे यांनी केले.
मी जनतेच्या समस्या सोडवून चार वेळा आमदार झालो. तसेच मंत्रीही झालो. एका शेतकर्याचा पोरगा प्रगती करतोय म्हणल्यावर विरोधकांना हे बघवले नाही. काही केल्या ऐकत नाही म्हटल्यावर माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम झाले. त्यांनी माझ्या कुटुंबाला त्रास दिला. बारामती, फलटणपासून अनेक जणांनी 29 केसेस केल्या. कटकारस्थाने केली. माझ्या बरोबरच माझ्या घरच्यांनाही त्रास दिला. परंतु त्यांच्यापुढे झुकलो नाही. माझ्यामुळे तुम्ही वाचलात नाहीतर जेलमध्ये असता, अशी टीका ना. जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याला स्टेजवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असून अनेक नगरसेवक व पदाधिकार्यांच्या भाजपमधील प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी राहिली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.