कोरेगाव : सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर मुगाव फाटा, ता. कोरेगाव येथे शनिवारी सायंकाळी पांढऱ्या रंगाच्या अज्ञात होंडा सिटी कारने दिलेल्या जोरदार धडकेत १५ वर्षीय अमृता फडतरे ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी श्रीशांत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यात नमूद केले आहे की, अमृता फडतरे ही विद्यार्थिनी शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास महामार्ग ओलांडण्यासाठी साईडपट्टीवर उभी असताना सातारा बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या होंडा सिटी कारने तिला एकदम जोरात धडक दिली. त्यामुळे अमृता फडतरे ही महामार्गावर फेकली गेली. तिच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत केली. जखमी अवस्थेत अमृता हिला खाजगी वाहनाने कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने सातारा येथील खाजगी रुग्णालयात ती हलविण्यात आले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात होंडा सिटी कार चालकाविरुद्ध निष्काळजी व अविचारी वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.