पृथ्वीराज चव्हाण यांना शह देण्यासाठी जेपी नड्डा येणार कराडमध्ये

by Team Satara Today | published on : 12 August 2024


कराड : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा हे 16 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.
भाजप नेते अतुल भोसले यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्यातून विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले यांना ताकद देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे 16 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा हे उपस्थित राहून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह महायुतीचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ अनौपचारिकरित्या फुटणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 10 लोकसभा मतदारसंघापैकी फक्त 4 लोकसभा मतदारसंघात यश मिळाले आहे, त्यामुळे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातूनच नड्डा यांचा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाजपचे नेते अतुल भोसले हे पारंपारिक विरोधक आहेत. भोसले यांच्या मतदारसंघात जनसंवाद कार्यक्रम ठेवून भाजपने पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट केल्याचे मानले जात आहे.
कराड दक्षिण मतदारसंघात यापूर्वी अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना तुल्यबळ लढत दिली आहे, त्यामुळे ही जागा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपने भोसले यांना पाठबळ देण्यास भाजपने सुरुवात केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन लवकरच…
पुढील बातमी
महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे पुन्हा प्रशासनाला निवेदन

संबंधित बातम्या