सातारा : शिवसेनेना शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, सादिक बागवान यांनी सातारा शहरातील विकासाच्या मुद्द्यावरून सातारा पालिकेला अल्टिमेटम दिला आहे. याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत त्यामुळे त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सादिक बागवान यांनी आज दि. 5 रोजी घरमालक व गाळामालक यांना घरफळ्यामध्ये 50 टक्के सवलत मिळावी असे फलक झळकवून लक्ष वेधून घेतले.
याशिवाय सातारा शहरातील राजवाडा ते कमानी हौद कमानी हौद ते शाहू चौक पवई नाका ते हुतात्मा उद्यान परिसर तसेच फुटका तलाव परिसर व गोडोली येथील जिजाऊ गार्डन येथील दिवे पूर्ण क्षमतेने प्रकाशित होत नाहीत. या सर्व परिसरांमध्ये बऱ्यापैकी अंधार आहे. याशिवाय कचरा विभागाच्या वतीने कचरा संकलनासाठी जे क्यूआर कोड देण्यात आले होते. त्यांचा वापर होत नाही. या सुविधांसाठी सातारा पालिकेने सातारकरांच्या कराची लाखो पैशाची उधळपट्टी केली असल्याचा आरोप बागवान यांनी यावेळी केला. याबाबत त्यांनी यापूर्वीच निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.
या विकास कामांच्या पाठपुराव्याचे काय झाले ? याकरिता बागवान यांनी सोमवारी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बापट यांच्याकडून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. पुन्हा एकदा जाताना बागवान यांनी घरमालकांना 50% कर सवलत दिली जावी या मागणीचा फलक झळकवून आपला निषेध व्यक्त केला.