विश्वास पाटील यांनी दिला साहित्यिकांच्या स्मृतींना उजाळा; थोर साहित्यिक आणि महापुरुषांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन

by Team Satara Today | published on : 31 December 2025


सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीत गुरुवारपासून (दि. ४) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सनईचौघडे वाजणार आहेत. या संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि ‘पानिपत’ या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांचे बुधवारी साताऱ्यात आगमन झाले. मात्र, साताऱ्यात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील थोर साहित्यिक आणि महापुरुषांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन करण्याचा एक आगळावेगळा ‘साहित्यिक प्रवास’चा नवा पायंडा पाडला.

संमेलनाच्या अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी विश्वास पाटील यांनी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस या दौऱ्यासाठी राखीव ठेवले होते. मंगळवारी (दि. ३०) त्यांनी तळेगाव दाभाडे (पुणे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देऊन संविधानाच्या शिल्पकार यांना अभिवादन केले. यानंतर नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी आणि मर्ढे (ता. सातारा) येथील आधुनिक मराठी कवितेचे जनक बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाला भेट देऊन साहित्यातील क्रांतीच्या वारसाला उजाळा दिला. येथे त्यांनी मर्ढे ग्रामस्थांशी संवादही साधला.

बुधवारी (दि. ३१) सकाळी ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथे जाऊन ‘प्रतिसरकार’चे प्रेरणास्थान क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर रेठरे हरणाक्ष येथे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जन्मभूमीला भेट देऊन त्यांनी लोकसंस्कृतीचा सन्मान केला. साताऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी कराड येथील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रास्त भाव दुकानांसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
साहित्य संमेलनासाठी वाहतूक बदलांचा आराखडा; नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे - पोलिस अधीक्षक तुषार दोशी

संबंधित बातम्या