सातारा : वंचित बहुजन आघाडी ही सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणारी चळवळ आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्र पक्षांसह किंवा स्वबळावर लढण्याचा आघाडीचा ठाम निर्धार आहे. समाजातील वंचित घटकांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आघाडीने संघर्षाची वाट निवडली असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय उपाध्यक्षा डॉ. कांताताई सावंत यांनी केले.
सामाजिक न्याय, समता आणि बहुजन हितासाठी कार्य करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय उपाध्यक्षा डॉ. कांताताई सावंत, तसेच केंद्रीय महासचिव प्रियदर्शी तेलंग प्रमुख उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील विविध भागांतील कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्या बोलत होत्या.
प्रवेश सोहळ्यात नव्याने पक्षात दाखल झालेले साताऱ्यातील चंद्रकांत खंडाईत व त्यांचे कार्यकर्ते गणेश कारंडे, दादासाहेब केदार, सुनील कदम तसेच शिरवळ खंडाळा तालुक्यातील शिवसेना उबाठा गटातून रामदास कांबळे यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. या सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यकर्त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ, शाल देऊन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. कांताताई सावंत म्हणाल्या, त्याचप्रमाणे केंद्रीय महासचिव प्रियदर्शी तेलंग यांनी नवीन कार्यकर्त्यांना पक्षाच्या धोरणांची माहिती दिली आणि संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे, हीच खरी बाबासाहेबांच्या विचारांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.
प्रवेशानंतर नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. उपस्थितांनी जयभीम आणि बहुजन एकता जयघोष देत कार्यक्रमात रंगत आणली. या प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनेला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.