सातारा,, दि. १७ : खटाव तालुक्यातील कटगुण येथील गोसावी वस्तीत बुधवार, दि. १७ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी गज मारून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी पती विनोद विजय जाधव याला अटक केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती , कटगुण ता. खटाव येथील विनोद विजय जाधव (वय २६) हा आज दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास स्वतःहून पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर राहून त्याने सांगितले की, मी काही वेळापुर्वी माझी पत्नी पिंकी विनोद जाधव (वय २१, रा. कटगुण, गोसावीवस्ती, ता. खटाव) हिचा चारित्र्याच्या संशयावरुन मी तिचे डोक्यात लोखंडी गज मारला असून ती घराजवळ डोकीत दुखापत झाल्याने रक्ताचे थारोळ्यात पडली आहे.
घटनास्थळी स.पो.नि.श्री. संदीप पोमण व कर्मचारी गेले. त्या ठिकाणी सौ. पिंकी विनोद जाधव हिच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत होवून ती रक्ताचे थारोळ्यात पडलेली दिसली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित तिचे नातेवाईक यांच्या मदतीने तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव या ठिकाणी आणले, परंतु, ती उपचारापुर्वीच मृत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विनोद विजय जाधव याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात लोखंडी गज मारुन तिला गंभीर जखमी करुन तिचा निघृणपणे खून केला. खुन केल्याची 'खबर देण्यासाठी स्वतःहून पुसेगाव पोलीस स्टेशनला हजर राहिला. मृत पिंकी विनोद जाधव हिस चिमुकली तीन मुले असून या घटनेमुळे कटगुण व पुसेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपी पती विनोद विजय जाधव याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यास पुसेगाव पोलिसांनी अटक केली आहे. स.पो.नि. संदीप पोमण हे गुन्हयाचा तपास करत आहेत.