सातारा : नवरात्रोत्सव सुरू असून, यामध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करण्याची सूचना शासनाने केली आहे; पण सुरुवातीला हे पोर्टल अडखळले आहे. अनेक अडचणी येऊ लागल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाराजी पसरली आहे. काही लाभार्थ्यांचे मोबाईलनंबरच जुळत नाहीत, वेबसाइट एरर, आधार ओटीपी न येणे आदी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या पोर्टलमध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
शासनाने आता लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन प्रक्रियाही होत आहे; पण यामध्ये ऑनलाइन केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणींना लाभार्थी महिलांना सामोरे जावे लागत आहे. ई-केवायसीसाठी उपलब्ध असलेल्या अधिकृत वेबसाइटवर तांत्रिक बिघाड असल्याचे येत आहे. ज्यामुळे प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी वेळेवर येत नाही किंवा अजिबात येत नाही. ज्यामुळे सत्यापन प्रक्रिया थांबते.
ओटीपी आल्यानंतरही तो मोबाईलमध्ये टाकण्यासाठी पर्याय उपलब्ध नसतो किंवा प्रक्रिया पुढे जात नाही. मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी एकाच वेळी ई-केवायसी करत असल्याने सर्व्हरवर ताण येत असल्यामुळे वेबसाइटची कार्यक्षमता कमी होत आहे. त्यामुळे सुरुवातीलाच अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने लाडक्या बहिणीमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
सरकारने ई-केवायसी अनिवार्य केल्याने; परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्या पूर्ण होत नसल्याने लाडक्या बहिणीत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना वेळेत ई-केवायसी पूर्ण करता येईल. अन्यथा केवळ केवायसीअभावी पात्र लाभार्थीही अपात्र ठरण्याची शक्यता आहे.