कराड : केंद्र सरकारतर्फे प्रतिवर्षी राबवण्यात येणार्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. सोमवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. कराड नगरपालिकेने सलग सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.
दि. 17 जुलै रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याबाबतचे पत्र कराड पालिकेस प्राप्त झाले आहे. पुरस्कार वितरणप्रसंगी कराडला मिळालेला क्रमांक जाहीर होणार आहे.
मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी पुरस्कार स्वीकारणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या पाच राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांतील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकांमध्ये कराड पालिकेने प्रथम क्रमांक मिळवला.
यापूर्वी 2019 व 2020 अशी दोन वर्षे कराडने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. तर, 2021 साली सहावा, 2022 मध्ये देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. 2019 मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कालावधीत पालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही 2023 मध्ये स्वच्छतेत सातत्य राखल्याने कराड पालिका अव्वल स्थानावर पोहोचली.
तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने 2024 मध्ये या स्पर्धेची तयारी केली होती. या स्पर्धेत कराडने देशात पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. या यशाबद्दल कराडकर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.