सातारा जिल्हा हा जसा क्रांतिकारकांचा तसा लष्करी सेवेत सहभागी असणार्या जवानांचा जिल्हा आहे. ही लष्करी ओळख आणखी वृद्धिंगत करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय लष्कराकडे रणगाडा देण्यासंदर्भात विशेष पाठपुरावा केला होता. तसेच या रणगाड्यासाठी येथील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये विशेष जागेची व्यवस्था करण्यात आली. दौलत नगर करंजे ग्रामीण आणि सदर बाजार या भागांना जोडणार्या सुभाषचंद्र बोस चौकामध्ये टी 55 रणगाडा रात्री उशिरा बसवण्यात आला. या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. एका अवजड क्रेनच्या सहाय्याने टी 55 हा रणगाडा चौकाच्या मधोमध बसवण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त या चौकात बसवलेल्या रणगाड्याचे सोमवार दिनांक 24 रोजी विशेष कार्यक्रमात अनावरण होणार आहे.
सातारा शहरामध्ये सातारा सैनिक स्कूल तसेच रायगाव येथील छाबडा मिलिटरी स्कूलमध्ये दोन रणगाडे यापूर्वीच बसवण्यात आले आहेत. मात्र त्यांची रचना शाळांच्या अंतर्गत भागात आहे. सध्या बसवण्यात आलेल्या टी 55 रणगाड्याला मात्र सातारकर येता जाता पाहू शकणार आहेत. या रणगाड्यामुळे सुभाषचंद्र बोस परिसराला विशेष शोभा आली असून सातारा शहराची तसेच जिल्ह्याच्या लष्करी परंपरेची ओळख नव्याने वृद्धिंगत होणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सातारकरांना विशेष प्रतीक्षा आहे.