सातारा : सातारा जिल्ह्यातील निरा-लोणंद रोडवर शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांकडून पोलिसांनी 6 पिस्टल, 30 काडतुसे, 6 मॅग्झीन अशी शस्त्रे जप्त केली. संशयित दोघे मोक्का सारख्या गुन्ह्यात जामीनावर असून तडीपारीची कारवाई असतानाही जिल्ह्यात ते शस्त्रे घेवून फिरत होते.
अमित ऊर्फ बिर्या रमेश कदम (वय 32, रा. लोणी, ता. खंडाळा), विशाल महादेव चव्हाण (वय 30, रा. भोळी, खंडाळा, जि. सातारा) अशी अटक केलेल्या दोन्ही गुन्हेगारांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाला (एलसीबी) अशी टीप मिळाली की, संघटीत गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत जामीनावर सुटलेले व सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेल्या दोघांकडे शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ते त्यांच्या एमएच 12 टीएस 1889 या कारमून निरा ते लोणंद रस्त्यावरुन जाणार आहेत. संशयित दोघे संबंधित शस्त्रे विक्री करणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सातारा एलसीबी पोलिसांनी माहिती घेवून सापळा लावला.
सातारा पोलिस संशयित गुन्हेगारांची व त्यांच्या कारची पाहणी करत होते. निरा-लोणंद रस्त्यावरील रेल्वे पुलावर संबंधित कार दिसल्यानंतर पोलिसांनी ती कार अडवली. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरले व ताब्यात घेतले. कारमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये 6 देशी बनावटीची पिस्टल, 6 मोकळ्या मॅग्झीन, 30 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल हॅन्डसेट व कार असा एकूण 15 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल संशयितांकडे होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तो मुद्देमाल जप्त केला. लोणंद पोलिस ठाण्यात संशयित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित फार्णे, फौजदार परितोष दातीर, विश्वास शिंगाडे, पोलिस विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर तसेच लोणंद पोलिसांनी सहभाग घेतला.