सातारा, दि. १७ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे सातारा जिल्ह्यात संविधान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ''बाबा आमची शान आहेत आणि संविधान आमची जान आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी संविधानाच्या रक्षणासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे,'' असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मोहनलाल पाटील म्हणाले, ''प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भारतीय संविधान आहे. हे संविधान लिहिणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तमाम भारतवासीयांची शान आहेत. समानतेचा मार्ग दाखवणारे संविधान ही प्रत्येकाची जाण झाली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या जनजागृतीसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पुढील काळात चैत्यभूमी ते दीक्षाभूमी संविधान जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. या चळवळीत सर्व १८ पगड जातीतील तरुणांनी सामील झाले पाहिजे.''
राष्ट्रीय सहसंघटक कैलास जोगदंड म्हणाले, ''पश्चिम महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचा झंझावात सुरू आहे. रिपाईचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे काम आम्ही करू. महाराष्ट्रात वैचारिक कार्यकर्त्यांची फौज निर्माण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.''
या कार्यक्रमास राजेश ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, संग्राम रोकडे, सुरेश पवार, सुनील ओव्हाळ, विनोद ओव्हाळ, महिला अध्यक्षा दामिनी निंबाळकर, सुमित जगताप, नीता खवळे, मनीषा सोनवणे, स्वाती गायकवाड, सुप्रिया येवले तसेच राजेंद्र होतकर, शाहरुख शेख, सलीम बागवान, सलीम शेख, शाहिद कुरेशी, आशपाक शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मदन खंकाळ यांनी केले, आभार रामभाऊ मंदाळे व राजू ओव्हाळ यांनी मानले.