कराड : शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताला त्रास होऊ लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी काल दाखल करण्यात आले होते. आज सकाळी संबंधित संशयिताने तेथून पलायन केले. त्यामुळे पोलिस दलाची चांगलीच भंबेरी उडाली होती. मात्र, पोलिसांनी मोठी यंत्रणा राबवून संबंधित संशयितास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. संतोष यशवंत साठे (रा. म्हासोली) असे संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांची माहिती अशी, संतोष यशवंत साठे (रा. म्हासोली) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला शारीरिक त्रास होऊ लागल्याने त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात काल दाखल केले होते. उपचार सुरू असताना संबंधित संशयिताने सकाळी रुग्णालयातून पलायन केले. काही काळ तो रुग्णालयात दिसला नसल्याने तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिस दलाला दिली.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी संशयिताच्या शोधासाठी सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर, श्रीमती शादिवान, पोलिस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलिस कर्मचारी संदीप कुंभार, संग्राम पाटील, आनंदा जाधव, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, कुलदीप कोळी, सज्जन जगताप, संतोष पाडळे यांची तीन पथके पान ८ वर मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणी पथके रवाना केली.
संबंधितांच्या शोध पटकन व्हावा, यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी एक संदेश सोशल मीडियावर पाठवला होता. त्याची माहिती घेऊन काही जणांनी भापकर यांना संबंधित संशयित सातारा येथे आल्याचे सांगितले. त्याचदरम्यान संबंधित हा जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याची माहितीही काही जणांनी भापकर यांना दिली.