बेकायदा बांधकामप्रकरणी आत्मदहनाचा इशारा

वडूज येथील शोभाताई गुरव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 23 January 2025


सातारा :  न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून वडूज, ता. खटाव येथे बेकायदेशीररित्या काही व्यक्तींकडून बांधकाम केले जात असल्याने, संबंधित बांधकाम थांबवण्यासह संशयीतांवर कारवाईच्या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा सौ. शोभाताई गुरव यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रमुख व अन्य प्रशासकीय यंत्रणेस दिलेल्या निवेदनात वडूज च्या श्री भैरवनाथ देवस्थानच्या विश्वस्त सौ. शोभा गुरव यांनी म्हटले आहे की, पेडगाव रस्त्यालगतच्या मुख्य चौकातील सर्वे नंबर 86 व 249 बाबत केलेले तथाकथित खरेदी विक्री दस्त बेकायदेशीर असल्याने ते रद्द करून मिळकतीचे कब्जे देवस्थानला परत मिळणे बाबत न्यायालयामध्ये दावा सुरू आहे. मात्र न्यायप्रविष्ठ बाब असूनही  आणि मा. न्यायालयाने 20 डिसेंबर 2024 रोजी संतोष मारुती शेटे व त्यांच्या मार्फत इतर कोणीही सदर मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम व खोदकाम करू नये, तसेच मिळकतीच्या स्वरूपात बदल करू नये, म्हणून तूर्ता तूर्त ताकीद दिलेली आहे. सदरील आदेश अस्तित्वात असतानासुद्धा संतोष शेटे यांनी संबंधित मिळकतीच्या लगत रस्त्याला मोठे बॅनर लावून आतील बाजूस काम सुरू केले आहे. याबाबत विचारणा केली असता श्री शेटे यांनी 24 डिसेंबर 2024 रोजी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा लेखी तक्रार अर्ज सौ. गुरव यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिला आहे. मात्र तरीही सुरू असलेल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी न्याय मिळण्यासाठी शोभा गुरव यांनी प्रजासत्ताक दिनी वडूज तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात व प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेत ९.०० टक्के व्याजदराची भांडवल पर्याप्तता दीर्घ मुदत ठेव योजना कार्यान्वीत : श्री. नितीन पाटील, अध्यक्ष
पुढील बातमी
संजय शेलार खून प्रकरणातील पाच संशयित जेरबंद

संबंधित बातम्या