सातारा : जिल्ह्यातील पवनचक्क्यांमधून तांब्याच्या तार असलेल्या केबल वायरची सातत्याने चोरी करणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा, यांनी भांडाफोड करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ गुन्हे उघडकीस आणून तब्बल १८ लाख ८० हजार १४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सारीश संजय सावळवाडे (वय २३, रा. आगाशिव नगर, ता. कराड, जि. सातारा, मूळ रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), दत्तात्रय जगन्नाथ झोरे (वय १९, रा. सडावाघापुर, ता. पाटण, जि. सातारा), निलेश श्रीमंत सूर्यवंशी (वय २७ रा. पाबळवाडी, ता. पाटण, जि. सातारा), प्रमोद सुरेश निकम (वय २६, रा. मसुर, ता. कराड, जि. सातारा) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
दि. ८ फेब्रुवारी ते दि. ५ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत सडावाघापुर व सडादाडोली परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तार असलेल्या केबल वायर चोरीस गेल्याच्या तक्रारी पाटण पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वीही अशा स्वरूपाच्या चोरीच्या घटना घडल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी हे गुन्हे गांभीर्याने घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना आरोपी शोधून गुन्हे उघडकीस आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. दि. १४ डिसेंबर २0२५रोजी गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, दत्तात्रय झोरे, सारीश सावळवाडे, निलेश सूर्यवंशी व प्रमोद निकम हे पवनचक्क्यांमधील केबल चोरी करत आहेत. त्यानुसार पथकाने पाटण, मसुर व कराड परिसरातून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सडावाघापुर, दाडोली, राजापुरी, पाडेकरवाडी, घाटेवाडी, मालोशी, बामणेवाडी व भांबे या परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधून केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रमेश गर्जे, रोहित फार्णे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
आरोपी पोलीस कोठडीत, अधिक तपास सुरू
आरोपींकडून खालील ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. पाटण पोलीस ठाणे : गु.र.नं. १९५/२0२५५, सातारा तालुका पोलीस ठाणे : गु.र.नं. १३१/२0२५ व ४३९/२0२५, उंब्रज पोलीस ठाणे : गु.र.नं. 0५/२0२५ व ३६२/२९२५ या कारवाईत १७,७६,०१४ रुपये किंमतीची केबल वायर व मशीन, १,००,००० रुपये किंमतीचा टेम्पो, वजनकाटा असा एकूण १८,८०,०१४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी चारही आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.