सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शहरातील संग्रहालयात उत्साहात कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रविण शिंदे यांनी छत्रपती वृषालीराजे भोसले यांचे स्वागत केले. आपल्या भाषणात छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे प्रत्येकामध्ये स्वाभिमान व धैर्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ञ घनश्याम ढाणे यांनी शिवाजी महाराजांच्या मोडी लिपीतील पत्रांचे वाचन करून त्यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी ऐतिहासिक गड-किल्ले व वास्तू पाहताना त्यांची नासधूस न करता पावित्र्य जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे, इतिहास संशोधन व वारसा जतन संस्थेचे सुभाष गायकवाड, इतिहास अभ्यासक निलेश झोरे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य माने सर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रा. धनाजी मासाळ, निकम, तसेच प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. दत्तात्रय कोरडे यांनी केली, तर सूत्रसंचालन विद्यार्थी रोहित कांबळे यांनी केले. शेवटी अभिरक्षक प्रविण शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.