सातारा : निगडी रंगनाथ स्वामी (ता. कोरेगाव) येथील अल्पवयीन मुलीचे कुमठे येथील आतिष जावळे या युवकाने अपहरण केल्याच्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करून देखील कोरेगाव पोलीस ठाण्याने तब्बल सहा दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी तात्काळ तपास करून मुलीचा शोध लावला नाही तर ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येईल तसेच पीडित कुटुंब आत्मदहनाचा मार्ग अवलंबेल, असा तीव्र इशारा मंगळवारी दुपारी देण्यात आला.
या प्रकरणी निगडी येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने अशोक जगताप, विजय जगताप, संजय जगताप, विवेक बोरगे, दीपक दिसले, दशरथ कदम, महादेव जगताप यांच्यासह सुमारे २५ ग्रामस्थांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात धडक देत तपासाबाबत जाब विचारला. यावेळी प्रभारी अधिकारी असलेले पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ हे प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी असल्याने तपासी अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन सादर केले.
संतप्त ग्रामस्थांनी सांगितले की, कोरेगाव शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुभाषनगर परिसरातून बुधवार दि. ११ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास या अल्पवयीन मुलीचे आतिष जावळे याने एकतर्फी प्रेमातून अपहरण केले. सुरुवातीला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतरही पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र सहा दिवस उलटूनही तपासात कोणतीही ठोस प्रगती दिसत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
या घटनेमुळे मुलीचे कुटुंबीय पूर्णपणे भयभीत झाले असून त्यांचा मानसिक धीर खचत चालला आहे. त्यांना आधार देण्यासाठी सोमवारी रात्री निगडी रंगनाथ स्वामी गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत कोरेगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका करण्यात आली आणि तपासातील कथित निष्क्रियतेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी पोलिसांच्या कामकाजाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करून अल्पवयीन मुलीचा शोध लावावा, अशी मागणी केली. अन्यथा ग्रामस्थ मोर्चा काढतील आणि पीडित कुटुंब आत्मदहनाचा निर्णय घेईल, असा गंभीर इशारा देण्यात आला.
दरम्यान, या संदर्भात पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कोरेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी तसेच तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.