नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचा (AAP) राजीनामा दिलेल्या कैलाश गेहलोत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आप प्राथमिक सदस्यत्वाचा आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आप नेते रघुविंदर शोकीन हे दिल्लीतील मंत्रिमंडळात नवे मंत्री होणार आहेत. रघुविंदर शोकीन हे नांगलोई जाटचे आमदार आहेत. ते कैलाश गेहलोत यांची जागी घेतील, असे 'आप'कडून सांगण्यात आले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात फेरबदल केला जात आहे. आप नेते आणि मंत्री कैलाश गेहलोत यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे गेहलोत यांच्याकडील खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री आतिशी सांभाळतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण आता रघुविंदर शोकीन यांचे नाव समोर आले आहे.
आप नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्राद्वारे राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर आज त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत हाती कमळ घेतले.