दुर्गम भागातील कातकरी, आदिवासी समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे : जिल्हाधिकारी संतोष पाटील

आदिवासी महिलांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाचा सण केला साजरा

by Team Satara Today | published on : 11 August 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील कातकरी समाजासह इतर आदिवासी समाजापर्यंत पोहोचवून आणि केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे, असे  निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. 

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्याहस्ते जोर, तालुका वाई येथील आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा प्राथमिक स्वरूपात लाभ देण्यात आला. याप्रसंगी वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मिटकरी, गटविकास अधिकारी विजय परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील, अविनाश ठोंबरे यांच्यासह आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे पदाधिकारी तसेच  जोर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जोर गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या गावालगत दोन धरणे आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधवांनी पर्यटन विभागाच्या आई योजनेचा लाभ घेऊन होम स्टे, बोटिंग क्लब यासह विविध सुविधा पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आदिवासी विभागानेही अशा प्रस्तावास सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. व आवश्यकते सहकार्य करावे. त्यातून या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या संख्येने पर्यटक येतील असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

जोर या गावातील 100 जणांना जातीचे दाखले दिले आहेत. या दाखल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. आरोग्य सुविधा पासून एक ही नागरिक वंचित राहू नये ही शासनाची भूमिका आहे. यासाठी येथील नागरिकांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून द्यावे. आधार कार्ड दुरुस्तीचे शिबिराचे आयोजन करावे. जोर येथील जिल्हा परिषद शाळेचा माझी शाळा आदर्श माझी शाळा उपक्रमात समावेश करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी येथील शाळेला निधी देण्यात येईल. येथील शिक्षकांनीही देण्यात आलेल्या सुविधांचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वापर करावा असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

जोर येथील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंद करून शेतकरी ओळखपत्र काढावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी या ओळखपत्राची आवश्यकता आहे त्यामुळे ते तातडीने काढून घ्यावे असे आवाहन करून तुमच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या थेट मला सांगा त्या निश्चितपणे सोडविल्या जातील, असे आश्वासनही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले.

आदिवासी बांधवांनी पारंपारिक वाद्य वाजवून जिल्हाधिकारी यांचे केले स्वागत :

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे जोर गावात आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी आदिवासी पारंपारिक वाद्य वाजवून आदिवासी व आदिवासी वेशभूषेत आदिवासी पारंपारिक नृत्य करून उत्साहात स्वागत केले. आदिवासी बांधवांनी व महिलांनी उस्फूर्तपणे केलेले स्वागत पाहून जिल्हाधिकारी पाटीलही भारावून गेले. 

आदिवासी महिलांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाचा सण केला साजरा :

जिल्हाधिकारी पाटील यांनी जोर गावला भेट दिली. या गावातील महिलांनी जिल्हाधिकारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी या बहिणींना ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत हा बंधुभाव दृढ केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जोर गावातील आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी :

जोर हे गाव अतिदुर्गम असून  या गावी भेट देत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जोर  गावी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये क्षयरोग तपासणी यासह इतर व्याधींचीही तपासणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी केली.

आदिवासी बांधवांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्नेहभोजन 

कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकारी पाटील यांनी आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन करू त्यांनी तयार केलेल्या पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेतला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अखेर त्या आंदोलकांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
वीजचोरी अन् वाढती थकबाकी खपवून घेतली जाणार नाही

संबंधित बातम्या