सातारा : भुईंज फिडर वरील शेतीपंपांना केवळ दोन तास वीज पुरवठा होत असल्याने येथील संतप्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने थेट मंगळवारी कृष्णानगर येथील वीज वितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांचा रुद्र अवतार पाहून कर्मचाऱ्यांनी तात्काळ भुईंज फिटरचा वीज पुरवठा पूर्ववत केला. वीज पुरवठ्यासाठी दरवेळेला आम्ही आंदोलनेच करायची का ? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे .
भुईंज येथील फिडरच्या सुरळीत वीज पुरवठ्याच्या सातत्याने तक्रारी होत्या . केवळ दोन तास वीज पुरवठा होत असल्याने शेत जमिनीला पाणी तसेच पिण्याच्या पाण्याच्या अडचणी सुद्धा ऐन हिवाळ्यात येथे सुरू आहेत .शेतीच्या कामांमध्ये वारंवार व्यत्यय येत असल्याने शेतकऱ्यांनी आज थेट कृष्णानगर येथील कार्यालयावर धडक मारली . वीज फिडरसाठी तात्काळ नवीन थ्री फेज लाईन कार्यान्वित करावी, देऊर येथे मंजूर असलेल्या सब स्टेशनचे काम पूर्ण करून अर्धा लोड तिकडे वर्ग करावा शंभर एचपी चे जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून द्यावेत व सातारा जिल्ह्यातील सर्व फिडरवर आठ तासाचा सुरळीत वीज पुरवठा असावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनामध्ये राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूर शाखा सातारा धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती यांचे सदस्य सहभागी झाले होते इरिगेशन फेडरेशनचे संपर्कप्रमुख अजित तांबे, जिल्हाध्यक्ष रणजीत फाळके, कोरेगाव तालुका अध्यक्ष जगदीश पवार, चंद्रकांत बर्गे,नंदकुमार पाटील, किशोर राऊत, सुधाकर बर्गे, सागर गायकवाड,आनंद जाधव, रमेश शिंदे इत्यादी यावेळी उपस्थित होते.