'विकासाचा महामेरू'

नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

by Team Satara Today | published on : 22 March 2025


सातारा : जावली मतदारसंघात केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंलबजावणी करून, विविध योजनांचा भरीव निधी मिळवून, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक विकास निधीचा प्रभावीपणे विनियोग करून घेऊन मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवणारे आमदार म्हणजेच ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले! आज सातारा आणि जावली मतदारसंघात सर्वप्रकारची विकासकामे मार्गी लागल्याने 'आता कोणते काम सुचवायचे' असा प्रश्न मतदारसंघातील प्रत्येक गावातील नेते, सरपंच आणि ग्रामस्थांना पडत आहे. याचे कारण म्हणजेच, 'विकासाचा महामेरू' नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले होय. आमदार कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आ. शिवेंद्रसिंहराजे! जनतेसाठी नेहमीच हवेहवेसे वाटणारे आमदार म्हणजेच आ. शिवेंद्रसिंहराजे! सातारा- जावलीतील जनतेच्या अलोट प्रेमामुळे विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले असून आता सातारा- जावलीसह संपूर्ण राज्यात विकासाचा झंजावात पाहायला मिळणार हे निश्चित! 

स्वर्गीय श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या निधनानंतर सातारा तालुक्याच्या समाजकारण, राजकारण आणि अजिंक्य उद्योग समूहाची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर आली. जुन्या- जाणत्या कार्यकर्त्यांसमवेत नवीन युवा कार्यकर्त्यांची सांगड घालून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा तालुक्याच्या समाजकारणाची धुरा यशस्वीपणे सांभाळून तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळवले. पुढे सातारा- जावली असा दोन तालुक्यांचा मिळून विधानसभा मतदारसंघ अशी रचना झाली. शिवेंद्रसिंहराजेंनी अनेक आव्हाने पेलत आपल्या अभ्यासु, निर्मळ आणि प्रेमळ स्वभावाने आणि अजोड कर्तृत्वाने सातारासह जावली मतदारसंघातील जनतेची मने जिंकली. त्यामुळेच आज शिवेंद्रसिंहराजे हाच जनतेचा पक्ष, असे गणित या मतदारसंघात सातत्याने पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंना जनतेने १ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देऊन अनोखा विक्रम केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली असून ना. शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या खात्यांतर्गत येणारी विकासकामे मार्गी लावण्याचा धडाका सुरु केला आहे. याशिवाय लातूरचे पालकमंत्री म्हणून ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या रूपाने लातूर जिल्ह्याच्या आजवरच्या इतिहासाला कलाटणी देणारा अध्याय सुरु झाला आहे.  

सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात सातत्यपूर्ण भरीव निधी आणून त्या- त्या गावातील विकासकामे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मार्गी लावली आहेत. प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजनेपासून डांबरी रस्ते, पूल, पाणी साठवण बंधारे, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, शाळा खोल्या, सभामंडप, आरोग्य आणि विद्युत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विकासकामे करताना त्या गावात किती मतदान आहे याला महत्व न देता कोणते काम करणे आवश्यक आहे याचा विचार ना.  शिवेंद्रसिंहराजेंनी कायम केला आणि म्हणूनच शिवेंद्रसिंहराजे आणि मतदारसंघातील जनतेचा ऋणानुबंध, जिव्हाळा आणि प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत झाले आहे. मतदारसंघाचा चौफेर विकास साधताना शिवेंद्रसिंहराजेंनी समाजकारणाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त, जळीतग्रस्त, आपत्तीग्रस्त, अपघातग्रस्त आणि रुग्ण अशा असंख्य गरजूंना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी कोणत्याही फंडाची अथवा निधीची वाट न पाहता स्वतः जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदतीचा हात दिला आहे. 

सातारा शहराचा कायापालट :

सत्ता असो वा नसो सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवेंद्रसिंहराजे नेहमीच कटिबद्ध राहिलेत. शहरातील प्रमुख रस्त्यांसह, विविध कॉलन्या, पेठा, गल्ली बोळे, यश सर्वच ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे जाळे केले. शहरातून बाहेत जाणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण मजबुतीकरण केले. तसेच शहरातील काही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ५० कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्यातील २५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा सातारा पालिकेकडे हस्तांतरीतही झाला आहे. किल्ले अजिक्यतारा कडे जाणाऱ्या रस्त्याचेही काँक्रीटीकरण  अत्याधुनिक पथदिवे बसवून पर्यटकांसह स्थानिकांची मोठी गैरसोय दूर केली आहे.  

कास धरणाची उंची वाढवून सातारचा पाणीप्रश्न सोडवला :

सातारा शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला मंजुरी मिळवली. हे काम पूर्ण झाले असून वाढीव जळवहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. कास धरणाची उंची वाढल्याने संपूर्ण सातारा शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. याशिवाय सातारा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आणि अखंडित व्हावा यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नातून ५० कोटी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता शहरात नळ कनेक्शनला मीटर बसवणे, शहापूर, जकातवाडी, सांबरवाडी येथे आणि शहरातील विविध पाणीसाठवण टाक्या येथे स्वयंचलित यंत्रणा बसवली जाणार आहे. तसेच हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या शाहूनगर, गोळीबार, विसावा नाका, शाहूपुरी या भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विविध उपाययोजना आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून सुरु आहेत. 

हद्दवाढीमुळे त्रिशंकू भाग विकासाच्या प्रवाहात :

सातारा शहराच्या हद्दवाढीला शिवेंद्रसिंहराजेंनी मंजुरी मिळवली आणि शाहूनगर, गोळीबार, विसावा नाका, शाहूपुरी आदी त्रिशंकू भाग खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात आला. या भागात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी भरीव निधी टाकून येथील पाणीप्रश्न, रस्ते यासह मूलभूत सोयी- सुविधा मार्गी लावल्या आहेत. तसेच या भागातील वाढीव घरपट्टी संधर्भात प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसून त्यांनी या भागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सातारा-जावलीत विकासाचा झंजावात :

सातारा आणि जावली तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना शिवेंद्रसिंहराजेंनी आजवर हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावली आहेत. सातारा तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वप्रकारची विकासकामे मार्गी लावून प्रत्येक गावाला विकसनशील आदर्श ग्राम बनवण्याचे स्वप्न शिवेंद्रसिंहराजेंनी साकार केले आहे. अगदी दुर्गम भागातील गावेही डांबरी रस्त्याने जोडली गेली आहेत. सातारा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून उरमोडी धरणापासून कालवे काढण्यात आल्याने उरमोडीचे पाणी शेतकऱ्याच्या शिवारात खळाळू लागले आहे. सातारा ते कास पठार रस्त्यासाठी हॅम योजनेतून निधी मिळवून रस्त्याचे रुंदीकरण केल्याने हा मार्ग दळणवळणासाठी सुकर झाला आहे. दुर्गम, डोंगराळ जावली तालुक्यात न भूतो न भविष्यती असा विकासाचा झंजावात शिवेंद्रसिंहराजेंनी करून दाखवला आहे. प्रत्येक गावात विकासकामांची कोटीची उड्डाणे पाहायला मिळत आहेत. दरी- खोऱ्यातील खेडी- पाडी डांबरी रस्त्याने जोडली गेली आणि विकास काय असतो ते प्रत्येक गावात दिसू लागले. जावली तालुक्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या आधी अनेक आमदार पहिले पण खरा विकासपुरुष शिवेंद्रसिंहराजेंच्या रूपानेच मिळाला, असे जावलीकर अभिमानाने सांगतात. 

मतदारसंघात जलक्रांती  :

सातारा आणि जावली तालुक्यातील शेतीला पाणी मिळाले पाहिजे आणि शेतकरी सधन झाला पाहिजे यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या प्रयत्नातून उरमोडी धरण उभे राहिले. या धरणाच्या पाण्यामुळे सातारा जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यातील दुष्काळी भागाची तहान भागवली जात आहे. या उरमोडी धरणाचे हक्काचे पाणी सातारा तालुक्यातील उरमोडी नदी परिसरात असलेल्या गावांना मिळाले पाहिजे अशी जनभावना होती. शिवेंद्रसिंहराजेंनी शाशनाकडे पाठपुरावा करून भरीव निधी मिळवला आणि उरमोडी उजवा कालव्यावर बंदिस्त पाईपलाईन करून  तालुक्यातील पोगरवाडी, उपळी, शेळकेवाडी, शिवाजीनगर, वेचले, भाटमरळीचा काही भाग, पाडळी, नागठाणे, अतित आणि खोडद आदी भागातील सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवला. कुसवडे धरणाच्या कालव्याचा प्रश्न सोडवला. जावली तालुक्यातील बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्पाला मंजुरी मिळवली असून हा प्रकल्पही मार्गी लावण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. याशिवाय गाव तेथे बंधारा अशी संकल्पना राबवून शिवेंद्रसिंहराजेंनी मतदारसंघात जलक्रांती केली आहे.  

पर्यटनाला चालना देण्यास प्राधान्य :

मतदारसंघातील पर्यटनवाढीबरोबरच रोजगारनिर्मितीला आ. शिवेंद्रसिंहराजेंनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. कास जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या कास पठार येथील पर्यटनवाढीसाठी त्यांनी सातारा यवतेश्वर ते कास पठार या रस्त्याचे रुंदीकरण केले. किल्ले अजिंक्यतारा रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. किल्ले सज्जनगड रस्त्याचे रुंदीकरण केले असून सातारा ते किल्ले अजिंक्यतारा, परळी ते सज्जनगड, उरमोडी धरण भिंत ते कास पठार आणि ठोसेघर येथे रोप वे उभारण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु असून आहे. त्यामुळे हि कामे लवकरच मार्गी लागून पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. कोयना शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून सुरु झाले आहे. यामुळे पर्यटनवाढीसह रोजगार निर्मिती चालना मिळाली आहे. कोयना शिवसागर जलाशयावर आपटी ते तापोळा येथे १५० कोटी रुपये निधीतून मोठा पूल उभारण्यात येत असून यामुळे कास पठारावर येणार पर्यटक थेट महाबळेश्वरमध्ये जाणार आहे. महामार्ग क्र. ४ ते पाचवड, कुडाळ, मेढा, कोळघर, अंधारी, फळणी, मुनावळे, वाघळी, शेंबडी, दरेतांब, पिंपरी, उचाट, खोपी, वेरळ ते महामार्ग क्र. ६६ या रस्त्यावर शेंबडी ते पिंपरी दरम्यान कोयना जलाशयावर केबल स्टे पुलाचे बांधकाम आणि व्हिविंग गॅलरी करणे यासाठी ३०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून हेही काम सुरु झाले आहे. या कामांमुळे पुणे, मुंबई येथील येणारा पर्यटक साताऱ्यातील विविध पर्यटनस्थळे, कास पठार, महाबळेश्वर करून पुढे थेट कोकणात उतरेल. या पुलांमुळे पर्यटकांचा वेळ आणि पैसा बचत होणार आहे तसेच पर्यटनवाढीलाही मोठी चालना मिळणार आहे. 

सातारा आणि जावली तालुक्यांमध्ये प्रशासनाला गतिमानता यावी आणि त्याचा फायदा जनतेला व्हावा यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी शासनाच्या विविध विभागांची नवीन सुसज्ज कार्यालये उभारण्यावरही भर दिला आहे. मेढा येथे न्यायालयाच्या इमारतीची उभारणी, सातारा आणि जावली तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतींची उभारणी केली आहे. सातारा उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी, तहसीलदार सातारा, पंचायत समिती सातारा यांच्या नवीन कार्यालयाच्या इमारती उभारणीस शिवेंद्रसिंहराजेंनी मंजुरी मिळवली असून लवकरच या सर्व इमारती उभारणीचे काम मार्गी लागणार आहे. 

सहकारातून समृद्धीकडे! 

स्व. भाऊसाहेब महाराज यांनी उभारलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला उभारी देऊन आर्थिक सक्षम कारखाना, उच्चतम दर देणारा कारखाना अशी ओळख शिवेंद्रसिंहराजे यांनी करून दिली आहे. एक स्वयंपूर्ण संस्था, शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था म्हणून अजिंक्यतारा कारखान्याचा नावलौकिक आहे. अजिंक्यतारा कारखान्याप्रमाणेच जावली तालुक्यातील जनतेची हक्काची संस्था, प्रतापगड सहकारी साखर खरखान पुन्हा सुरु करण्याचे शिवधनुष्य शिवेंद्रसिंहराजेंनी लीलया पेलले आहे. अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योगसमूहाच्या माध्यमातून तीनचार वर्ष बंद असलेला प्रतापगड कारखाना पुन्हा सुरु करून उसाची कमतरता असतानाही सलग दोन गळीत हंगाम यशस्वीपाने सम्पन्न करून दाखवले, याशिवाय उसपुरवठादार शेतकऱ्यांना उच्चतम दर देऊन जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि प्रतापगड कारखान्याला खऱ्या अर्थाने उभारी देण्याचे काम शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून झाले आहे.  

जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवणारे आमदार अशी ख्याती असलेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या मतदारसंघाचा चौफेर विकास साधला आहे. सत्तेतील कोणत्याही पदापेक्षा मतदारसंघाचा विकास महत्वाचा मानून शिवेंद्रसिंहराजेंनी नेहमीच सकारात्मक वाटचाल केली आहे. त्यामुळेच राज्यात सातारा- जावली मतदारसंघ हा एक 'आयडियल' मतदारसंघ ठरला आहे आणि शिवेंद्रसिंहराजे हे राज्यातच नव्हे तर देशात एक 'आयडॉल' आमदार म्हणून ओळखले जातात! राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर आता सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्रिपद मिळताच ना. शिवेंद्रसिंहराजेंनी राज्यातील विविध जिल्ह्यातील खात्याशी संबंधित विकासकामांचा आढावा घेऊन प्रलंबित विकासकामे तसेच प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी स्वतः लक्ष घातले आहे. 

मंत्रिमंडळातील एक अभ्यासू, जिद्दी आणि कर्तृत्ववान मंत्री अशी ख्याती ना. शिवेंद्रसिंहराजेंची आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट होईल, अशी अपेक्षा राज्यभरातील जनतेची आहे. आगामी काळात ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून जनतेची अपेक्षापूर्ती निश्चितच होईल यात तिळमात्र शंका नाही! 

- अमरसिंह मोकाशी, सातारा 

     (७३५००१०३०३)


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाडवा मेळाव्याच्या अनुषंगाने दादरच्या शिवाजी महाराज मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
पुढील बातमी
सलमान-शाहरुखसोबत काम करण्यावर आमिर खानचं वक्तव्य चर्चेत

संबंधित बातम्या