रेठरे बुद्रुक : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने नवी दिल्लीत गौरविण्यात आले. देशातील साखर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली येथील ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ’ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. कृष्णा कारखान्याची वाटचाल डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे सुरू आहे. याची दखल घेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२३-२४ या हंगामासाठी उच्च साखर उतारा गटात, उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठीच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड जाहीर केली होती.
नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी उत्तरा भोसले यांच्यासह संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बांभनिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.