कोल्हापुर : विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलींवरही जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र, या निर्णयाला पहिला ठाम विरोध कोल्हापुरातून व्यक्त झाला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयावर हरकती नोंदवण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की हा कायदा लागू होण्याच्या मार्गावर असून, सध्या त्याला विरोध दर्शवत आहोत.
गरज भासल्यास आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचाही इशारा त्यांनी दिला. तसेच, राज्य सरकारनेही या विषयावर आपली भूमिका मांडावी, असे ते म्हणाले. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून, त्यात पोस्टाद्वारे किंवा ई-मेलद्वारे हरकती नोंदवण्याचे नमूद आहे. वेळ कमी असल्याने शक्य तितक्या जास्त हरकती नोंदवा, असेही त्यांनी आवाहन केले. ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्याची कल्पना नेमकी कोणाच्या मनात आली हे समजण्याचा मार्ग नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना आधीच हमीभाव मिळत नाही, त्यात आता हा 25 हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे आम्ही ईडीआर आणि जीपीएस तयार करणारी कोणती कंपनी आहे का याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही त्याची ठोस माहिती मिळालेली नाही.
त्यांनी सांगितले की या निर्णयावर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले की ट्रॅक्टरवर ईडीआर आणि जीपीएस बसवण्याची खरंच आवश्यकता आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सर्व शेतकऱ्यांनी 18 तारखेपूर्वी हरकती नोंदवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. निर्णय होण्याआधीच या हरकती पोहोचाव्यात यासाठी आम्ही हे आवाहन करत आहोत. हा विषय देशभरातील असल्याने आम्ही आत्तापासूनच शेतकऱ्यांना सजग करत आहोत.
दिल्लीत एसीच्या कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे करणाऱ्यांना शेतीची वास्तव परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजत नाहीत. आमचा बळीराजा शेतात घाम गाळतो, तो महामार्गावर मालवाहतूक करत नाही. अशा स्थितीत त्याच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावरचा आर्थिक आघातच आहे. आधीच महागाई आणि निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला हा अतिरिक्त खर्च झेपणारा नाही. त्यामुळे सरकारने वास्तवाचा विचार करून ही जाचक अधिसूचना तातडीने मागे घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून लढा उभारावा लागेल, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.