हनुमान जयंतीनिमित्त साताऱ्यात घुमला भीमरूपीचा गजर

विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी

by Team Satara Today | published on : 02 April 2026


​सातारा : सातारा शहरासह जिल्हाभरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ऐतिहासिक जरंडेश्वर हनुमान मंदिरासह समर्थ रामदास स्वामी स्थापित सातारा जिल्ह्यातील अकरा मारुती मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम विधिवत पार पडले. यानिमित्ताने ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सव सोहळा, रुद्रपठण आणि अन्य धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.

​जरंडेश्वर येथील डोंगरमाथ्यावरील मारुती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सातारा शहरातील रामाचा गोट, मंगळवार पेठ, सोमवार पेठ यांसह विविध भागांतील मारुती मंदिरांमध्ये जन्मकाळ सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. काही मंदिर व्यवस्थापनांच्या वतीने महाप्रसाद आणि फळवाटपाचे नियोजन करण्यात आले होते. विशेषतः पंताचा गोट येथील मारुती मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत रुद्रपठण आणि यज्ञयाग सोहळा संपन्न झाला.

​दिवसभर मंदिरांमध्ये काकड आरती, अभिषेक आणि विशेष पूजाविधी सुरू होते. भाविकांनी रामनाम जप, भजन आणि कीर्तनाचा लाभ घेतला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत काही मंडळांनी रक्तदान शिबिर आणि अन्नदानासारखे उपक्रमही राबवले. सायंकाळच्या सुमारास शहरातील विविध मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीनं मिरवणुका काढल्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. हा उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूणच, साताऱ्यातील हनुमान जयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद विशेष सभेसाठी १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुढील बातमी
स्थायीच्या सभेत आरोग्य निरीक्षकाची झाडाझडती; १८० विकासकामांना सातारा नगरपालिकेचा हिरवा कंदील

संबंधित बातम्या