प्युरिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरात युरिक अॅसिड तयार होते. यूरिक अॅसिड हा एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे जो शरीरातून फिल्टर केला जातो. परंतु, जर युरिक अॅसिड आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू लागले तर ते अनेक आरोग्य समस्यांचे कारण बनते. यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने गाउट होतो. त्यामुळे पायाच्या बोटांना सूज येते. यासोबतच सांध्यामध्ये युरिक अॅसिडचे क्रिस्टल्स जमा होऊ लागतात आणि त्यामुळे गुडघे आणि हाताच्या बोटांना सूज येऊ लागते.
अशा परिस्थितीत, हे जास्त युरिक अॅसिड वेळेत कमी करणे महत्त्वाचे आहे. डॉ. सलीम झैदी हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि ते इन्स्टाग्रामवर आरोग्याशी संबंधित टिप्स शेअर करत राहतात. अशाच एका व्हिडिओमध्ये डॉ. झैदी यांनी सांगितले की कोणते पदार्थ खाल्ल्याने युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होऊ शकते,
दुधी भोपळा
अनेकांना दुधीभोपळा ही भाजी आवडत नाही. मात्र दुधीभोपळ्याने आरोग्याला खूप चांगले फायदे मिळतात. विशेषतः सकाळी उपाशीपोटी दुधीचा रस पिण्याने वजन कमी होते तर याशिवाय दुधी भोपळ्याचा रस पिल्याने शरीरातील घाणेरडे युरिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत होते. तुम्हाला जर युरिक अॅसिडची समस्या असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित दुधीचा ताजा रस प्यावा.
आहारात काकडीचा समावेश करून घ्या
काकडी ही आपल्या शरीरातील उष्णता थंड ठेवण्याचेही काम करते. काकडीमध्ये प्युरीन कमी असते पण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. काकडीतील पाणी शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करते. तुम्ही दररोज काकडीचे सॅलड खाऊ शकता किंवा काकडीचा रसदेखील पिऊ शकता. यामुळे शरीरातील वाढलेले युरिक अॅसिड नियंत्रणात आणण्यास मदत मिळते
आवळ्याचा करा उपयोग
व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील युरिक अॅसिड काढून टाकण्यास मदत होते. आवळा हे असे फळ आहे जे आरोग्यसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते अनेक आजारांपासून दूर राहण्यापर्यंत आवळ्याचा उपयोग करून घेता येतो. संत्री, लिंबू, आवळा आणि पेरू हे व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ आहेत. याचा तुम्ही युरिक अॅसिड कमी करण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता.
सातूचे पाणी
बार्लीचे पाणी ठरेल उत्तम
बार्ली अर्थात सातूचे पाणी पिण्याने शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होते. तुम्ही सातूचा दलिया खाऊ शकता किंवा सातूच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी बनवून खाऊ शकता. यामुळे शरीरातील वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्यास मदत मिळते. सातूचे पाणी नियमित पिण्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवू शकतो
पाणी
योग्य प्रमाणात पाणी प्या
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दररोज २.५ ते ३ लिटर पाणी प्यावे. जर तुम्हाला युरिक अॅसिड असल्यास पाणी पित राहिलात तर ते लघवीसोबत शरीराबाहेर पडू लागेल आणि ही समस्या लवकरात लवकर निघून जाण्यास मदत मिळते. पाणी प्रमाणात पिण्याने शरीरातील अनेक आजार दूर राहतात आणि युरिक अॅसिडही त्याला अपवाद नाही.
जास्त युरिक अॅसिड असल्यास काय खाऊ नये
⦁ जास्त युरिक अॅसिड असल्यास, साखरयुक्त पेये पिणे टाळावे
⦁ जास्त फ्रुक्टोज सिरप पिणे देखील टाळावे
⦁ ज्या लोकांना युरिक अॅसिडचा त्रास आहे त्यांनी अल्कोहोल पिऊ नये
⦁ ऑर्गन मीट खाणे टाळावे
⦁ किडनी आणि मेंदू इत्यादी खाणे टाळावे
⦁ ट्यूना आणि ट्राउटसारखे समुद्री अन्न खाऊ नये
⦁ लाल मांस खाऊ नये.