सातारा : शालेय जीवनात होणारे संस्कार जीवनभर उपयोगी पडत असतात. ज्ञानार्जन हे महत्वाचे आहेच मात्र, त्यासमवेत विद्यार्थ्यांनी विविध कला, क्रीडा कौशल्ये आत्मसात करावीत व छंदही जोपासावेत, असे आवाहन सौ. वैशाली अजिंक्य क्षीरसागर यांनी केले.
येथील नूतन मराठी प्राथमिक शाळा (महिला मंडळ) शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व व पारितोषिक वितरण समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. वैशाली क्षीरसागर बोलत होत्या. यावेळी महिला मंडळ संस्थेच्या किलबिल बाल वाटिका व नूतन मराठी प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा नयना क्षीरसागर होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, गायन, देशभक्तीपर गीते, पारंपरिक गीते या कार्यक्रमांना भरभरून दाद मिळाली.
नयना क्षीरसागर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी यांचा पारितोषिक व भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. माजगावकर, सौ. तडसरे, सौ. घोरपडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती शिल्पा घोसाळकर, बालवाडी विभागाच्या सौ. प्रतीक्षा लवळे व सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जगताप व श्रीमती लोहकरे यांनी केले. सौ. जया माने यांनी आभार मानले.