सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची पदोन्नती रोखावी

माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांची पत्रकार परिषदेत मागणी

by Team Satara Today | published on : 06 August 2025


सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी नागठाणे येथील डॉक्टर घाडगे यांच्याकडून झालेल्या गर्भपात प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने तपास केला. या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. तरीसुद्धा त्यांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत ती पदोन्नती थांबवण्यात यावी, अशी मागणी मीरा-भाईंदर नगरपालिकेचे माजी नगरसेवक व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटलमध्ये एका महिलेची प्रसृती कंपाऊंडरद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित अर्भक हे दगावले होते. यासंबंधीचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव येथे कार्यरत असताना 7 मार्च 2023 रोजी डॉक्टर विकास घाडगे व डॉक्टर मेधा घाडगे यांना अटक करुन पोलीस रिमांड न मागता त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर व्हावी, असा न्यायालयासमोर अहवाल सादर केला. तेलतुंबडे यांना न्यायालयाने अभिप्राय मागितल्यानंतर दिनांक 8 मार्च 2023 रोजी आरोपी डॉक्टर विकास घाडगे यांना योग्य त्या अटी शर्तीवर सोडण्यात यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयात पत्राद्वारे सादर केली. या गंभीर गुन्ह्यात आरोपीची त्यांनी एकही दिवस पोलीस रिमांड मागितली नाही. या कृतीद्वारे त्यांनी आरोपीलाच मदतच केली आहे. यासंदर्भात तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट रवींद्र तेलतुंबडे यांना बढती मिळेल, असे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात आरोपींना मदत करणार्‍या पोलिसांना पदोन्नती मिळते, असा संदेश या घटनेतून गेला आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत तेलतुंबडे यांची पदोन्नती थांबवण्यात यावी आणि तेलतुंबडे यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गावांच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
पुढील बातमी
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून उबाठा गट आक्रमक

संबंधित बातम्या