सातारा : भारतीय जनता पार्टीच्या सातारा कार्यकारिणीचे सक्रिय सदस्य सुनील काळेकर यांनी नागरिकांच्या वतीने येथील लोणार चौकातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण राहून अभिनव आंदोलन केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हलगी वादन करत नागरिकांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून सातारा पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
नगरपालिकेच्या कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला. सातारा शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची वाट लागली असून त्यामध्ये प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शहर कार्यकारिणीचे स्वीकृत सदस्य सुनील काळेकर यांनी वृक्षारोपणाचा अभिनव मार्ग निवडला. लोणार चौक परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यात तसेच शाहू चौक आणि पोलीस मुख्यालय ते सातारा एसटी स्टँड यादरम्यानच्या रस्त्यावर दोन ठिकाणी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून काळेकर यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना द्याव्यात व त्या संदर्भात प्रशासनाला निर्देशित करावे, अशी मागणी यावेळी सुनील काळेकर यांनी केली.
शहरामध्ये दुचाकी वरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. रस्त्यावर पाणी साठून त्या पाण्यावरुन आतल्या खड्ड्यांचा वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळेच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्ही या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहोत. नगरपालिकेने तातडीने हे खड्डे भरावेत, अशी मागणी काळेकर यांनी करत संबंधित अधिकार्यांच्या कर्तव्यशून्य कारभाराचा निषेध केला.