महाबळेश्वर : येथील एस. टी. स्थानकामध्ये बदली होत नाही या कारणावरून येथील कर्मचाऱ्याने बस स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. आगारातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हा अनुचित प्रकार टळला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर आगारात एकाच कार्यालयात अशोक शंकर संकपाळ व विनोद शिवाजी सुतार हे दोघे काम करत असून त्यांची बदली होत नाही म्हणून महाबळेश्वर आगारात अर्ज केले आहेत. परंतु, बदलीचे अधिकार सातारा कार्यालयातील विभागीय नियंत्रकांकडे असल्याबाबत माहिती अशोक शंकर संकपाळ व विनोद शिवाजी सुतार यांना आगारामार्फत समजावून सांगण्यात आली होती. याबाबत त्यांना नोटीस देखील काढली. परंतु, नोटीस न स्वीकारता उलट अर्ज करीत तीन तासांत आत्महत्या करतो, असे सांगत अशोक शंकर संकपाळ (वय ४४, रा. भोलावडे, ता. भोर. जि. पुणे) यांनी बस आगाराच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकाराने एकच धांदल उडाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत यावेळी रुग्णवाहिका, नगरपालिकेचा अग्निशामक दल बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. हवालदार शेलार घटनास्थळी उपस्थित होते. आगारातील कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. शेवटी लक्ष्मीकांत भोसले या कर्मचाऱ्याने बराच वेळ समजवल्यानंतर अशोक संकपाळ यांना सुरक्षित खाली उतरविण्यात आले.